कीटकनाशक फवारणीच्या सुरक्षिततेबाबत कृषी विभागामार्फत व्यापक जनजागृती; शेतकरी व शेतमजुरांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याबाबत कृषी विभागाकडून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे. सदर प्रकरणातील संबंधित रुग्णास तातडीने आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात आले असून, आवश्यक वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर संबंधित रुग्णास रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. सदर बाबतीत आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.
कीटकनाशकांची
फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांनी योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या
अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये सुरक्षित फवारणीबाबत जनजागृती
निर्माण करण्यासाठी कृषी विभागामार्फत सातत्याने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना,
प्रशिक्षण, समुपदेशन व प्रसिद्धी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
सुरक्षित फवारणी अभियानांतर्गत कृषी विभागाची कार्यवाही
महाराष्ट्र
शासनाच्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली तसेच संबंधित संस्थेच्या सहकार्याने “सुरक्षित
फवारणी अभियान” राबविण्यात येत असून, दि. १ जुलै २०२६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कार्यवाही करण्यात आली आहे.
शेतकरी व शेतमजुरांचे प्रशिक्षण
कीटकनाशकांची
फवारणी करताना घ्यावयाची काळजी, कीटकनाशकांची सुरक्षित हाताळणी, औषधाचे योग्य
प्रमाण, फवारणीची योग्य पद्धत, वैयक्तिक संरक्षण साधनांचा वापर तसेच विषबाधेची
लक्षणे व त्यावरील प्राथमिक उपाययोजना याबाबत शेतकरी व शेतमजुरांना प्रत्यक्ष
मार्गदर्शन करण्यात आले. अहवाल कालावधीत जिल्ह्यात एकूण २५ प्रशिक्षण कार्यक्रम
घेण्यात आले असून त्यामध्ये ४८० शेतकरी/शेतमजुरांनी सहभाग घेतला आहे.
शेतकरी व शेतमजुरांचे
समुपदेशन
फवारणी करताना
वैयक्तिक सुरक्षितता, संरक्षक साधनांचा वापर, फवारणीच्या वेळी घ्यावयाची खबरदारी,
फवारणीनंतरची स्वच्छता तसेच विषबाधेची लक्षणे दिसून आल्यास तातडीने वैद्यकीय मदत
घेण्याबाबत ३३ शेतकरी/शेतमजुरांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
मोबाईल एसएमएसद्वारे जनजागृती
कृषी
विभागामार्फत जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणीसंदर्भातील
संदेश एसएमएसद्वारे पाठविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याद्वारे
फवारणीपूर्वी, फवारणीदरम्यान व फवारणीनंतर घ्यावयाच्या आवश्यक खबरदारीबाबत
शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यात येत आहे.
पोस्टर्सद्वारे जनजागृती
शेतकरी व
शेतमजुरांचे लक्ष वेधण्यासाठी गावपातळीवर तसेच संबंधित ठिकाणी ५५ पोस्टर्स
लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सच्या माध्यमातून सुरक्षित फवारणी, वैयक्तिक संरक्षण
साधनांचा वापर आणि कीटकनाशक विषबाधा टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत जनजागृती
करण्यात येत आहे.
माहितीपत्रिकांचे वितरण
सुरक्षित
फवारणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करणाऱ्या १६ हजार २५० माहितीपत्रिकांचे वितरण
करण्यात आले आहे. या माहितीपत्रिकांमध्ये कीटकनाशकांची हाताळणी, फवारणीची सुरक्षित
पद्धत, संरक्षण साधनांचा वापर आणि विषबाधेपासून बचाव याबाबत मार्गदर्शन करण्यात
आले आहे.
संरक्षक किट वितरणाची प्रक्रिया सुरू
फवारणीच्या वेळी
शेतकरी व शेतमजुरांनी वैयक्तिक संरक्षण साधनांचा वापर करावा, या उद्देशाने संरक्षक
किट उपलब्ध करून देण्याची व वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. संरक्षक किटची उपलब्धता
व प्राप्तीच्या अनुषंगाने उपलब्धतेनुसार पात्र व गरजू शेतकरी/शेतमजुरांना
टप्प्याटप्प्याने सदर किटचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे किट वितरणाची
कार्यवाही ही उपलब्धतेनुसार सातत्याने सुरू राहणार आहे.
प्रसिद्धी वाहनाद्वारे व्यापक जनजागृती
जिल्ह्यातील
शेतकरी व शेतमजुरांपर्यंत सुरक्षित फवारणीचा संदेश पोहोचविण्यासाठी प्रसिद्धी
वाहनाद्वारे गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. अहवाल कालावधीत जिल्ह्यात ३३८
गाव/ठिकाणी प्रसिद्धी वाहनाद्वारे भेटी देऊन जनजागृती करण्यात आली आहे. यामध्ये
सुरक्षित फवारणी, कीटकनाशकांचा योग्य वापर, यक्तिक संरक्षण साधने आणि विषबाधा
झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याबाबत माहिती देण्यात येत आहे.
फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांनी घ्यावयाची खबरदारी
कीटकनाशकांची
फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांनी पुढील बाबींची विशेष काळजी घ्यावी- कीटकनाशकाची
बाटली/पॅकिंगवरील लेबलवरील सूचना व शिफारशीत मात्रा काळजीपूर्वक वाचूनच औषधाचा
वापर करावा. फवारणी करताना मास्क, हातमोजे, चष्मा, पूर्ण बाह्यांचे कपडे व इतर
वैयक्तिक संरक्षण साधनांचा वापर करावा. फवारणी करताना औषधाचा शरीराच्या त्वचेवर,
डोळ्यांमध्ये किंवा तोंडामध्ये संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी. फवारणी
करताना खाणे, पिणे किंवा धूम्रपान करणे टाळावे. वाऱ्याची दिशा लक्षात घेऊन फवारणी
करावी. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये. शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात
कीटकनाशक वापरू नये. विविध कीटकनाशके मनमानी पद्धतीने एकत्र मिसळू नयेत. फवारणी
पूर्ण झाल्यानंतर हात, चेहरा व शरीर स्वच्छ पाण्याने धुवावे. फवारणीसाठी वापरलेले
कपडे स्वतंत्रपणे धुवावेत. कीटकनाशकांची
रिकामी पाकिटे/बाटल्या इतर घरगुती वापरासाठी वापरू नयेत. फवारणी करताना चक्कर येणे, मळमळ, उलटी,
डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास त्रास किंवा अन्य त्रास जाणवल्यास फवारणी
तात्काळ थांबवून जवळच्या शासकीय अथवा मान्यताप्राप्त रुग्णालयात वैद्यकीय उपचार
घ्यावेत.
कृषी विभागाचे आवाहन
कीटकनाशक फवारणी
ही पिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक असली तरी ती करताना योग्य सुरक्षा उपाययोजना
करणे तितकेच महत्त्वाचे आहे. शेतकरी व शेतमजुरांनी केवळ कीड नियंत्रणावर भर न देता
स्वतःच्या आरोग्याच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. यवतमाळ जिल्ह्यात
सुरक्षित फवारणीबाबत जनजागृती, प्रशिक्षण, समुपदेशन, प्रसिद्धी, माहितीपत्रिका
वितरण तसेच एसएमएसद्वारे संदेश प्रसारित करण्याची कार्यवाही सुरू असून,
उपलब्धतेनुसार संरक्षक किटचे वितरणही टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.
कृषी
विभागामार्फत सुरक्षित फवारणीबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना यापुढेही
सातत्याने राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शेतकरी व शेतमजुरांनी कृषी
विभागाच्या मार्गदर्शनानुसार कीटकनाशकांचा
वापर करून फवारणी करताना आवश्यक वैयक्तिक संरक्षण साधनांचा वापर करावा, असे आवाहन
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ यांच्यामार्फत करण्यात येत आहे
Comments
Post a Comment