जलसंधारण दिन विशेष लेख :
जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त
महाराष्ट्राचा भक्कम पाया
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधार आहे. बदलते
हवामान, एल निनोचे वाढते आव्हान आणि घटती भूजल पातळी यामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधिक
अधोरेखित झाले आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून तो जमिनीत मुरवणे, ही काळाची
गरज आहे. जलसंधारणात “मातीला
नवजीवन, शेतीला आधार आणि भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य” देण्याची ताकद आहे.
महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर
असून त्यापैकी १७४.७३ लाख हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. राज्यातील सुमारे ८२ टक्के
शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे
ही काळाची गरज बनली आहे. राज्यातील २४१ लाख हेक्टर क्षेत्र पाणलोट विकासासाठी पात्र
असून त्यापैकी १८२.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची विविध कामे पूर्ण झाली
आहेत. उर्वरित क्षेत्रावरही नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत.
महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी
ठेवत विविध प्रभावी योजना राबविल्या आहेत आणि राबवित आहेत. राज्याला जलसुरक्षिततेच्या
दिशेने सक्षमपणे पुढे नेण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सातत्याने कार्यरत असून जलस्रोतांचे
संवर्धन, भूजल पुनर्भरण, विकेंद्रित जलसाठ्यांची निर्मिती आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला
प्राधान्य दिले जात आहे.
जलयुक्त शिवार अभियानामुळे ज्या गावांमध्ये काही वर्षांपूर्वी
टँकरशिवाय पाणी मिळत नव्हते, तिथे आज विहिरी जिवंत झाल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना वर्षातून
एकच पीक घ्यावे लागायचे, ते आता दोन आणि काही भागांत तीन पिकांकडे वळताना दिसत आहेत.
जलसंधारणामुळे निर्माण होणारे संरक्षित सिंचन हे केवळ शेतीपुरते मर्यादित राहत नाही,
तर ग्रामीण बाजारपेठ, रोजगार, दुग्धव्यवसाय आणि लघुउद्योगांनाही चालना देते. जलयुक्त
शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत राज्यातील 5858 गावांमध्ये सुमारे 1.43 लाखांहून
अधिक कामे प्रस्तावित झाली आहेत. त्यापैकी 1.24 लाखांपेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत.
जुलै-2026 अखेर या अभियानावर 2300 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला आहे.
‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त
शिवार’ ही योजना तर पर्यावरण आणि शेती यांचा सुंदर समन्वय आहे. धरणातील गाळ काढल्यामुळे
पाणीसाठा वाढतो, तर तोच गाळ शेतात गेल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. रासायनिक खतांवरील
अवलंबित्व कमी होते आणि उत्पादनक्षमता सुधारते. 2023-24 ते 2025-26 पर्यंत राज्यातील
3305 जलाशयांमधून 980.50 लक्ष घ.मी. गाळ काढण्यात आला असून तो 1 लाख 93 हजार एकर क्षेत्रावर
पसरविण्यात आला. यासाठी सुमारे 345.00 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून 81,114
स.घ.मी. पाणीसाठा पुन: स्थापित झालेला आहे. म्हणजेच जलसंधारण हे शेतीला केवळ पाणी देत
नाही, तर जमिनीला नवजीवन देवुन मृद संधारण सुद्धा करते.
माती ही केवळ शेतीचा आधार नाही, तर अन्ननिर्मितीची खरी
प्रयोगशाळा आहे. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले नत्र, स्फुरद, पालाश यांसह कॅल्शियम,
मॅग्नेशियम, गंधक, लोह, जस्त, बोरॉन यांसारखे सूक्ष्म व स्थूल अन्नद्रव्ये मातीत असतात.
मातीची सुपीकता टिकून राहिली, तिच्यातील सेंद्रिय कर्ब आणि ओलावा कायम राहिला, तर शेतीची
उत्पादकता आणि पिकांची गुणवत्ता सुधारते. मात्र मृदाक्षयामुळे वरची सुपीक माती वाहून
गेली, तर केवळ पाणी उपलब्ध असूनही शेतीची उत्पादकता टिकवणे कठीण होते. म्हणूनच ‘पाणी
अडवा, पाणी जिरवा’सोबत ‘माती वाचवा, मातीची सुपीकता वाढवा’ हा विचारही तितकाच महत्त्वाचा
आहे. शेतातील बांधबंदिस्ती, समतल चर, नाला खोलीकरण, पाणलोट विकास आणि सेंद्रिय घटकांचे
संवर्धन यांसारख्या उपाययोजनांमधून पाणी आणि माती दोन्हीचे संरक्षण होते. पाणी जपले
तर शेतीला आधार मिळतो; पण माती जपली तर त्या पाण्याला उत्पादनाची ताकद मिळते. म्हणून
मृदसंधारण हा जलसंधारणाचा अविभाज्य भाग असून, समृद्ध माती आणि सुरक्षित पाणी यांची
सांगडच शाश्वत शेतीची खरी हमी आहे.
भूजल पुनर्भरण हा जलसंधारणाचा सर्वात मोठा नैसर्गिक फायदा
मानला जातो. गेल्या काही दशकांत भूजलाचा अमर्याद उपसा झाला आणि आजदेखील होत आहे. त्यामुळे
अनेक भागांत विहिरी कोरड्या पडणे, बोअरवेलची खोली वाढणे आणि पाणी उपलब्धता नसल्यास
त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दुरगामी परिणाम होतो. मात्र जेव्हा पावसाचे पाणी योग्य
प्रकारे जमिनीत मुरवले जाते, तेव्हा भूगर्भातील जलस्तर पुन्हा वाढू लागतो. ही प्रक्रिया
केवळ शेतीसाठी नव्हे, तर पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. कारण
भविष्यातील जलयुद्ध टाळायचे असेल, तर भूजल संवर्धनाशिवाय दुसरा पर्याय नाही.
जलसंधारणाचा परिणाम पर्यावरणावरही अत्यंत सकारात्मक होतो.
जेव्हा एखाद्या भागात पाणी टिकून राहते, तेव्हा तेथील जैवविविधता वाढते. वृक्षसंवर्धनाला
चालना मिळते, जमिनीतील ओलावा टिकतो, तापमान संतुलित राहण्यास मदत होते आणि नैसर्गिक
परिसंस्था मजबूत बनते. अनेक ठिकाणी जलसंधारणाच्या कामांनंतर पक्षी, वन्यजीव आणि जलचर
पुन्हा दिसू लागल्याची उदाहरणे समोर आली आहेत. म्हणजेच जलसंधारण ही केवळ विकासाची योजना
नसून निसर्गाशी पुन्हा नाते जोडण्याची प्रक्रिया आहे.
आज हवामान बदल ही जगासमोरील सर्वात मोठी समस्या मानली जाते.
एल निनोमुळे पावसाचे स्वरूप बदलत आहे. काही दिवसांत अतिवृष्टी, तर उर्वरित काळात कोरडे
वातावरण हे नवीन वास्तव आहे. अशा परिस्थितीत मोठी धरणे किंवा केवळ पारंपरिक सिंचन व्यवस्था
पुरेशी ठरणार नाही. गाव पातळीवर पाणी अडवणे, पाणलोट विकास करणे, नैसर्गिक जलमार्ग जिवंत
ठेवणे आणि स्थानिक जलस्रोत मजबूत करणे हाच शाश्वत मार्ग आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर
आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून मृद व जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवार
अभियान 2.0, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आणि लघु सिंचन प्रकल्पाच्या
कामांना युद्धपातळीवर गती दिली आहे. गरजेनुसार दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या
सूचनांमधून जलव्यवस्थापनाबाबत शासनाचा दूरदृष्टीचा दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येतो.
या सर्व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये मा.मुख्यमंत्री
देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा.उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मा.उपमुख्यमंत्री
सुनेत्राताई अजित पवार यांच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विभागाच्या नव्या
प्रशासकीय आकृतिबंधाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अधिक वेग आला
आहे. मंजूर कामे मूळ आराखड्यानुसार आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर विशेष
भर देण्यात आला आहे. गुणवत्तापूर्ण कामांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना तयार करण्यात
आल्या असून मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांनाही प्राधान्य
दिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी
करत जलसंधारण अधिक परिणामकारक करण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून प्रधानमंत्री
कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये १४०
प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून ५.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर जलसंधारण,
भूजल पुनर्भरण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेला चालना देणारी
विविध कामे सुरू आहेत. या योजनेचे एकूण प्रकल्पमूल्य १,२५१.११ कोटी रुपये असून जुलै-2026 अखेर सुमारे 1003
कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन, सिमेंट बंधारे, पाणलोट
विकास, नाला खोलीकरण, भूजल पुनर्भरण आणि लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या जलसंवर्धन
उपक्रमांची प्रभावी सांगड घालत महाराष्ट्र जलसुरक्षिततेच्या दिशेने भक्कम वाटचाल करत
आहे. नाला खोलीकरणाबरोबरच बांबू लागवडीसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांवरही भर दिला आहे.
विदर्भातील मालगुजारी तलावांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात
आले असून हा दृष्टिकोन केवळ पाणी साठविण्यापुरता मर्यादित नसून जलस्रोतांचे दीर्घकालीन
संवर्धन सुनिश्चित करणारा आहे.
मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने माजी मुख्यमंत्री दिवंगत
सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने राज्यात १५ ते २१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान
"जलसंधारण सप्ताह" आणि १५ ऑगस्ट, २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान
"जलसंधारण अभियान" आयोजित करण्यात आले आहे. तर २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील
सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत "महा वॉकेथॉन-वॉक
फॉर वॉटर" या उपक्रमाचे आयोजन करुन जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य
राज्य शासनाने हाती घेतले आहे. या उपक्रमाची थीम सेव सॉईल, सेव वॉटर, सीक्यूर टूमारो
( Save Soil, Save Water, Secure Tomorrow) अशी असून पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त
महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात या दिवशी कमाल ३ किलोमीटर
(महा वॉकेथॉन) चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे असे कार्यक्रमाचे स्वरुप आहे.
जलसंधारणाच्या या लोकचळवळीत युवकांनी सहभाग होण्यासाठी रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात
आले.
जलसंधारण ही केवळ शासनाची योजना नाही, तर समाजाच्या सामूहिक
सहभागातून यशस्वी होणारी लोकचळवळ आहे. शासनाचे दूरदृष्टीचे धोरण, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या यांचे
प्रभावी नेतृत्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांच्या बळावर जलसमृद्ध, दुष्काळमुक्त
आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प अधिक दृढ होत आहे. जलसंधारण दिनानिमित्त प्रत्येक
नागरिकाने पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा संकल्प केला, तर ही लोकचळवळ अधिक व्यापक,
प्रभावी आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
1. सोबत फोटो – स्व. सुधाकरराव नाईक
2. लेखक फोटो – संजय राठोड


Comments
Post a Comment