युवक-युवतींनी ‘इंडिया स्कील कॉम्पीटीशन’मध्ये सहभागी व्हावे
जिल्हा कौशल्य विकास विभागाचे आवाहन
यवतमाळ, दि.१7 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी व राष्ट्रीय
कौशल्य विकास परिषद (एनएसडीसी) यांच्या माध्यमातून देशातील सर्वात प्रतिष्ठित इंडिया
स्कील कॉम्पीटीशन २०२६-२७ कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील आयटीआय,
पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी, पदवी महाविद्यालये तसेच विविध कौशल्य प्रशिक्षण संस्थांमधील
विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी व कुशल युवक-युवतींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी
होऊन जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुशील उचले यांनी केले आहे.
इंडिया
स्कील कॉम्पीटीशन २०२६-२७ ही देशातील उत्कृष्ट कौशल्यधारक युवक-युवतींना राष्ट्रीय
तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देणारी
स्पर्धा आहे. या स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये तसेच
पुढे वर्ल्ड स्कील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते.
विविध
तांत्रिक, औद्योगिक व सेवा क्षेत्रातील अनेक कौशल्य प्रकारांसाठी नोंदणी सुरू असून,
पात्र उमेदवारांनी स्कील इंडिया डिजिटलच्या https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर
जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.
पात्रता :
संबंधित
कौशल्य प्रकारानुसार निर्धारित वयोमर्यादा लागू राहील. स्पर्धेच्या नियमांनुसार पात्र
उमेदवारांनाच सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव पात्रता निकष निश्चित
करण्यात आला आहे. स्पर्धेतील ५६ कौशल्य क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३
किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. तसेच सायबर सिक्युरिटी, इंडस्ट्री ४.०, मेकॅट्रॉनिक्स
आणि रोबोट सिस्टिम्स इंटिग्रेशन या टीम स्किल्ससाठीही हीच वयोमर्यादा लागू राहील. तर
ऑटोनॉमस मोबाईल रोबोटिक्स, काँक्रीट कन्स्ट्रक्शन वर्क आणि लँडस्केप गार्डनिंग या टीम
स्किल्ससाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतरचा असणे बंधनकारक आहे.
Comments
Post a Comment