खरीप हंगाम पिकांची नोंदणी आता ई-पीक पाहणी सहायक करणार

 


                                     शेतकऱ्यांना स्वतः पीक नोंदणी करण्याची आवश्यकता नाही

                                                     शासनामार्फत सहायकांना मानधन;

                                                              शेतकऱ्यांनी पैसे देवू नये

             यवतमाळ, दि.25 (जिमाका) :  यावर्षी खरीप हंगामात केंद्र शासनाच्या डिजिटल पीक पाहणी या मोबाईल ॲपद्वारे पिकांची पाहणी होणार असून ही पीक पाहणी १०० टक्के तहसील कार्यालयामार्फत नियुक्त करण्यात आलेले महसूल सेवक, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, ग्रामस्तरावर मानधन घेणारे कर्मचारी तसेच नियुक्त करण्यात आलेल्या अन्य व्यक्ती यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या पीक नोंदणीचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी शेतकऱ्यांना स्वतः पीक नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार नाही.

            पीक पाहणी सहायकांमार्फत करण्यात येणाऱ्या ई-पीक पाहणीच्या कामावर ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे. तसेच सहायकांमार्फत करण्यात येणाऱ्या ई-पीक नोंदणीसाठी कोणत्याही सहायकाला पैसे देण्याची आवश्यकता नाही. या कामासाठी नियुक्त सहायकांना शासनामार्फत मानधन देण्यात येणार आहे.

            ई-पीक नोंदणीचा कालावधी १० नोव्हेंबर 2026 पर्यंत  जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक किंवा स्थानिक प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत आपल्या गावात नियुक्त करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी सहायकाचे नाव व संपर्क क्रमांक घ्यावा आणि आपल्या शेतातील पिकांची अचूक नोंदणी होण्यासाठी त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

            पीक पाहणी केल्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज काढणे, पीक विम्याचा दावा करणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची अचूक नोंदणी होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित