टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत युवकांसाठी अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रम


‘टीबी वॉरियर्स’ ची गावागावात जनजागृती मोहीम

            यवतमाळ, दि. 25 (जिमाका) : टीबी मुक्त भारत अभियानाला युवकांच्या सक्रिय सहभागाची जोड देत मेरा युवा भारत, आणि जिल्हा क्षयरोग कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांसाठी अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ ऑगस्टपर्यंत सुरु असलेल्या या उपक्रमातून युवकांना क्षयरोगाविषयी शास्त्रीय व व्यवहार्य माहिती देऊन ‘टीबी वॉरियर्स’ म्हणून सक्षम करण्यात येत आहे.

            या प्रशिक्षणामध्ये क्षयरोगाची कारणे, लक्षणे, प्रतिबंध, तपासणी, उपचार, योग्य पोषण, औषधोपचारातील नियमितता तसेच क्षयरोगाबाबतचे गैरसमज आणि सामाजिक कलंक याविषयी प्रत्यक्ष अनुभवातून मार्गदर्शन केले जात आहे. प्रशिक्षण घेतलेले युवक आपल्या गावातील नागरिकांमध्ये जनजागृती करून क्षयरोगाच्या संशयित रुग्णांना वेळेत तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करणार आहेत.

            या अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमात सोनवाढोणा, गोधणी, मनपूर, भारी आणि जांब या गावांतील युवक सहभागी झाले आहेत. सहभागी युवकांमध्ये रुचिता देते, प्रतिक्षा जुनघरे, काजल राठोड, सुहास ढोबळे, अंकुश शेळके, स्नेहल पेद्राम, सुशांत राठोड, आदित्य मडावी, अमर येरणकर आणि रोहित राठोड यांचा समावेश आहे.

            या उपक्रमाचे आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष डोळे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विशाल धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. डॉ. सुरेश जाधव आणि प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर डॉ. माणिक राठोड यांचेही मार्गदर्शन लाभत आहे. मेरा युवा भारत, यवतमाळचे जिल्हा युवा अधिकारी सुरज शिंदे आणि कार्यक्रम अधिकारी अनिल ढेंगे यांच्या समन्वयातून उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.

२४ ऑगस्टपासून गावागावात जनजागृती

            अनुभवात्मक शिक्षणातून प्रशिक्षित झालेले टीबी वॉरियर्स २४ ऑगस्ट पासून संबंधित गावांमध्ये माहिती, शिक्षण व संवाद  उपक्रम राबविणार आहेत. ग्रामस्थांना क्षयरोगाची लक्षणे, प्रतिबंध, तपासणी, उपचार आणि योग्य पोषणाबाबत माहिती देण्यासोबतच क्षयरोगाविषयीचे गैरसमज व सामाजिक कलंक दूर करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.

            दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला, ताप, वजन कमी होणे किंवा रात्री घाम येणे यांसारखी लक्षणे आढळल्यास विलंब न करता तपासणी करून घेण्याचे आवाहन युवकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. संशयित व्यक्तींना वेळेत तपासणी व निदानासाठी प्रोत्साहित करण्याबरोबरच उपचार सुरू केलेल्या रुग्णांनी औषधोपचाराचा पूर्ण कोर्स नियमितपणे घेण्याबाबतही जनजागृती केली जाणार आहे.

            डिजिटल आणि सोशल मीडिया युगातील युवकांची संवादक्षमता, सर्जनशीलता आणि सामाजिक प्रभाव लक्षात घेता क्षयरोग निर्मूलनाच्या जनआंदोलनात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. युवकांची ऊर्जा आणि सामाजिक बांधिलकी योग्य दिशेने वळवून गावागावात जनजागृतीची प्रभावी साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.

            युवकांचा सक्रिय सहभाग, जनतेमध्ये जागृती आणि प्रशासनाचा समन्वय यांच्या माध्यमातून ‘टीबी मुक्त भारत’ या राष्ट्रीय संकल्पनेला जिल्ह्यात अधिक बळकटी देण्याचा निर्धार या उपक्रमातून करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित