गाव ते जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’; रुग्णालयनिहाय सेवा निश्चित
आरोग्य विभागाचा
महत्वपूर्ण निर्णय
सार्वजनिक आरोग्य सेवेत
पारदर्शक, विश्वासार्हता वाढणार -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
यवतमाळ, दि.27 (जिमाका)
: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार
दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने रुग्णालयनिहाय
आरोग्यसेवांचे सर्वसमावेशक मानक निश्चित केले आहेत. ग्रामीण रुग्णालयापासून ३०,
५०, १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत
कोणत्या स्तरावर कोणते तज्ज्ञ डॉक्टर, सुश्रुषा सेवा, कुशल मनुष्यबळ, प्रयोगशाळा व
रेडिओलॉजी सेवा, औषधे आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध असाव्यात, याची स्पष्टता शासन
निर्णयातून करण्यात आली आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात
आलेल्या या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सेवा अधिक सुसूत्र
होण्याबरोबरच नागरिकांना कोणत्या रुग्णालयात कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, याची
माहिती सहज मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शासकीय आरोग्यसेवेतील पारदर्शकता आणि
नागरिकांचा विश्वास वाढण्यास हातभार लागणार आहे.
रुग्णालयाच्या क्षमतेनुसार सेवांचे स्पष्ट मानक
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध स्तरावरील रुग्णालयांमध्ये
उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांची विविध मानके एकत्रित करुन रुग्णालयनिहाय सेवा
निश्चित करण्यात आल्या आहेत. रुग्णालयाची खाट क्षमता आणि सेवा स्तर यानुसार तज्ज्ञ
वैद्यकीय सेवा, नर्सिंग, अलाइड हेल्थ व पॅरामेडिकल मनुष्यबळ, प्रयोगशाळा सेवा तसेच
इतर रुग्णसेवांचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत.
फिजिशियन, सर्जन, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ,
अस्थिव्यंग तज्ज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, दंतशल्यचिकित्सक
आदी तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता रुग्णालयाच्या स्तरानुसार निश्चित करण्यात आली
आहे. त्यामुळे शक्य तितक्या उपचारांसाठी रुग्णांना दूरच्या शहरांकडे जाण्याची गरज
कमी होण्यास मदत होणार आहे.
३०८ प्रकारच्या निदानात्मक चाचण्यांची स्पष्टता
निदानात्मक सेवांबाबतही शासन निर्णयात स्पष्ट मानके निश्चित
करण्यात आली आहेत. ग्रामीण रुग्णालयांमध्ये ७६ व १०० खाटांच्या उपजिल्हा
रुग्णालयांमध्ये ११० आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये १२२ प्रकारच्या निदानात्मक
चाचण्यांची उपलब्धता निश्चित करण्यात आली आहे. अशा प्रकारे या तीन स्तरांवर मिळून
३०८ प्रकारच्या निदानात्मक चाचण्यांबाबत स्पष्टता करण्यात आली आहे.
यामध्ये रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, विविध रक्त तपासण्या, यकृत व
मूत्रपिंड कार्याच्या तपासण्या, लिपिड प्रोफाइल, एचबीए वन सी , थायरॉईड, पॅप
स्मिअर, काही कर्करोग विषयक तपासण्या तसेच विविध संसर्गजन्य आजारांच्या
तपासण्यांचा समावेश आहे.
एक्स-रेपासून
एमआरआयपर्यंत रेडिओलॉजी सेवा
रुग्णालयाच्या स्तरानुसार एक्स-रे आणि सोनोग्राफीसारख्या रेडिओलॉजी
सुविधा उपलब्ध असणे अपेक्षित करण्यात आले आहे. १०० खाटांपेक्षा अधिक क्षमतेच्या
रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅनची सुविधा, तर जिल्हा रुग्णालय स्तरावर एमआरआय सुविधेचे
निकष निश्चित करण्यात आले आहेत.
कुशल मनुष्यबळावर विशेष भर
आरोग्यसेवेची गुणवत्ता केवळ डॉक्टरांच्या उपलब्धतेवर अवलंबून नसून
प्रशिक्षित नर्सिग आणि पॅरामेडिकल मनुष्यबळही तितकेच महत्त्वाचे असल्याने
त्यांचेही रुग्णालयनिहाय निकष निश्चित करण्यात आले आहेत.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, ईसीजी तंत्रज्ञ,
क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढीतील मनुष्यबळ, आहारतज्ज्ञ, भौतिकोपचार तज्ज्ञ,
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते आणि मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ते अशा विविध अलाइड
हेल्थ व पॅरामेडिकल मनुष्यबळाची उपलब्ध स्पष्ट करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियाच्या माध्यमातूनही
सार्वजनिक आरोग्य संस्थांसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यामध्ये १११ सुपर स्पेशालिस्ट, १ हजार ५१९ स्पेशालिस्ट, २ हजार ९१९ वैद्यकीय
अधिकारी, ३ हजार ५ आयुष वैद्यकीय अधिकारी आणि ११ हजार ५७१ स्टाफ नर्स यांसह विविध
संवर्गांचा समावेश आहे.
अत्यावश्यक औषधांची उपलब्धता निश्चित
रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आवश्यक औषधे उपलब्ध राहावीत, यासाठी
रुग्णालयाच्या स्तरानुसार अत्यावश्यक औषधांची यादी आणि आवश्यक औषधसाठ्याबाबतचे
निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे औषधांची उपलब्धता अधिक नियोजनबद्ध
पद्धतीने सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे.
रक्तपेढी, डायलिसिसपासून माता-बाल आरोग्य सेवांपर्यंत सुविधा
या मार्गदर्शक सूचनांमध्ये केवळ डॉक्टर, तपासण्या आणि औषधांपुरतेच
मर्यादित न राहता विविध पूरक आरोग्यसेवांचाही समावेश करण्यात आला आहे. रक्तपेढी व
रक्त संक्रमण केंद्र, आयुष सेवा, डायलिसिस सुविधा, लसीकरण कक्ष, माता-बाल आरोग्य
सेवा, प्रसूती कक्ष आदी सुविधांबाबतही रुग्णालयाच्या स्तरानुसार स्पष्टता करण्यात
आली आहे.
याशिवाय रुग्णवाहिका, दिव्यांग प्रमाणपत्र, वैद्यकीय फिटनेस
प्रमाणपत्र, डिस्चार्ज प्रमाणपत्र,जन्म-मृत्यू नोंदणी, जननी सुरक्षा योजनेचा लाभ,
आहार सुविधा आणि तक्रार निवारण व्यवस्था यांसारख्या रुग्णाभिमुख सेवांनाही महत्त्व
देण्यात आले आहे.
मानकांनुसार आरोग्यसेवा हा केंद्रबिंदू
गावातील ग्रामीण रुग्णालयापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत उपलब्ध
होणाऱ्या आरोग्यसेवांचे स्पष्ट मानक निश्चित झाल्यामुळे सार्वजनिक आरोग्य
व्यवस्थेत अधिक क सुसूत्रता आणि उत्तरदायित्व निर्माण होण्यास मदत होणार आहे.
प्रत्येक रुग्णालयात उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा आणि पायाभूत सुविधांचा प्रभावी
वापर करून नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर देण्यात आला आहे.
“नागरिकाला कोणत्या रुग्णालयात कोणती सेवा मिळणार, कोणते तज्ज्ञ
डॉक्टर उपलब्ध असतील, कोणत्या तपासण्या होतील आणि कोणत्या सुविधा उपलब्ध असतील,
याची स्पष्ट माहिती असणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेत
पारदर्शकता वाढून नागरिकांचा शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल,” असा
विश्वास आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.
गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत 'मानकांनुसार आरोग्यसेवा' उपलब्ध
करून देण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, सार्वजनिक आरोग्य
व्यवस्था अधिक सक्षम, नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यास त्याचा मोठा
फायदा होणार आहे.
Comments
Post a Comment