उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ निवडीसाठी जिल्हास्तरीय निवडी समिती गठीत
यवतमाळ, दि. 25 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सन 2026 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत जिल्ह्यातून तीन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हास्तरीय निवड समिती गठीत करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय निवड समितीच्या अध्यक्षपदी निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध
बक्षी, तर सदस्य म्हणून जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
एस. एस. ढोले, निवासी पोलीस उपनिरीक्षक राजेश गाढे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे
यांचा समावेश आहे. जिल्हा नियोजन अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव अशासकीय सदस्य म्हणून
शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक डॉ. राहुल काशिनाथ एकगोटे तसेच जिल्ह्यातील
मूर्तिकार राजू मोतीराम चिंधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्पर्धेत केवळ संबंधित यंत्रणेकडे नोंदणीकृत अथवा परवानाधारक सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळांनाच सहभागी होता येणार आहे. पात्र मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र
कला अकादमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे विहित
मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना
प्रत्यक्ष भेटी देऊन शासन निर्णयात नमूद केलेल्या निकषांच्या आधारे तालुकास्तरावर निवड
करण्यात येणार आहे. तालुकास्तरीय निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या परीक्षण अहवाल,
छायाचित्रे, चलचित्रे व संबंधित कागदपत्रांच्या आधारे जिल्हास्तरीय समितीमार्फत अंतिम
गुणांकन करून जिल्ह्यातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मंडळांची निवड केली
जाणार आहे.
स्पर्धेच्या नियमानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या मागील सलग दोन वर्षांत
राज्यस्तरीय अथवा जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त केलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे
यावर्षीच्या पारितोषिकासाठी पात्र राहणार नाहीत. इतर मंडळांना संधी मिळावी, या उद्देशाने
ही अट लागू करण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंडळांना
ही अट लागू राहणार नाही.
जिल्हास्तरीय समिती तालुक्यांतून प्राप्त परीक्षण अहवाल व उपलब्ध पुराव्यांच्या
आधारे शासन निर्णयातील निकष आणि मार्गदर्शक सूचनांनुसार गुणांकन करणार आहे. त्यानुसार
प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मंडळांची निवड करून त्यांची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे
करण्यात येणार आहे.
स्पर्धेत समान गुणांकन प्राप्त झालेल्या मंडळांपैकी ज्या मंडळाची स्थापना
अधिक वर्षांपूर्वी झालेली आहे, त्या मंडळास पारितोषिकासाठी प्राधान्य देण्यात येईल.
तसेच कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही स्तरावर सहभागी मंडळांचे विभाजन करून स्वतंत्रपणे
पारितोषिक विजेते घोषित करता येणार नाही, याची दक्षता सर्वस्तरीय निवड समित्यांना घ्यावी
लागणार आहे.
जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय स्पर्धेचे नियंत्रण अधिकारी जिल्हाधिकारी
आहेत. तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेतील द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या
मंडळांचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने
जिल्हास्तरावर सन्मान करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment