वीटभट्ट्या, हॉटेल्सची तपासणी होणार > बालकामगार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

यवतमाळ, दि. ४ : जिल्ह्यात बालकामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील वीटभट्ट्या, हॉटेल्स व इतर आस्थापनांची तपासणी करावी, त्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सरकारी कामगार अधिकाऱ्यांना दिले. महसूल भवन येथे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कामगार कायद्याची अंमलबजावणी, ई श्रम नोंदणी इत्यादी बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सरकारी कामगार अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी मीना यांनी जिल्ह्यात कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देत कामगारांच्या सामाजिक संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. शहरी व ग्रामीण भागातील वीटभट्ट्या, हॉटेल्स व इतर आस्थापनांधील बालकामगार व बालमजुरी रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. याठिकाणी बालकामगार, वेठबिगारी कामगार आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. प्रलंबित कामगारांची ई श्रम नोंदणी पूर्ण करावी त्यासाठी इतर विभागांचे सहकार्य घ्यावे. तसेच तालुकास्तरीय पथकांनी सतर्क राहून कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले. हेल्पलाईन किंवा कामगार विभागाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. याशिवाय माथाडी कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवून जास्तीत जास्त पात्र कामगारांची नोंदणी करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी निर्देशित केले. 0000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान