खैरगाव येथे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची ३० वी सभा उत्साहात
प्रगतशील शेतकऱ्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण ; एकात्मिक शेती पद्धतीची प्रत्यक्ष पाहणी
यवतमाळ, दि. 27
(जिमाका) : कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत
असलेल्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची ३० वी सभा पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव येथे
प्रगतशील शेतकरी कृष्णाभाऊ देशेट्टीवार यांच्या शेतावर उत्साहपूर्ण वातावरणात
संपन्न झाली.
या सभेला जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, उपविभागीय कृषी अधिकारी सी.जे.निंघोट, मंचाचे
अध्यक्ष जगदीश चव्हाण, उपाध्यक्ष बाबासाहेब कपिले यांच्यासह मंचाचे १५ सदस्य
उपस्थित होते. यावेळी नुकताच उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कृष्णा
देशेट्टीवार तसेच वसंतराव नाईक प्रतिष्ठान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अशोक
वानखेडे यांचा शेतकरी शास्त्रज्ञ मंचातर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे महत्त्व अधोरेखित
केले. “शेतकरी शास्त्रज्ञ मंच ही यवतमाळ जिल्ह्याच्या शेतीची ओळख आहे,” असे
प्रतिपादन त्यांनी केले. मंचाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी एकत्र
येत असून, त्यांच्या अनुभवांचा आणि सूचनांचा जिल्ह्याच्या कृषी विकासासाठी
निश्चितच मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी शास्त्रज्ञ
मंचाच्या सदस्यांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना कृषी विभागामार्फत सकारात्मकतेने विचारात
घेण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील शेतीच्या विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूचनांची
अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी
दिली.
याप्रसंगी से-ट्री
संस्थेचे आबा लाड यांनी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या
फळबाग वाढीच्या उपक्रमाची माहिती दिली. जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र वाढविण्यासाठी
शेतकरी, कृषी विभाग आणि संबंधित संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे
असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात फळबाग क्षेत्र वाढविण्याच्या या उपक्रमास
सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पुरस्कारप्राप्त अशोक
वानखेडे आणि श्री बेंडे यांनी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या आगामी कार्याची दिशा,
शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि कृषी विकासामध्ये मंचाची भूमिकाबाबत मनोगत व्यक्त
केले.
या सभेनंतर प्रगतशील
शेतकरी कृष्णा देशेट्टीवार यांच्या शंभर एकर प्रक्षेत्राची पाहणी करण्यात आली.
त्यांच्या शेतावरील एकात्मिक शेती पद्धतीची प्रत्यक्ष पाहणी करुन विविध पिकांची
लागवड, पीक व्यवस्थापन, उत्पादन तंत्रज्ञान तसेच शेतीशी संबंधित विविध उपक्रमांची
माहिती शेतकऱ्यांनी घेतली. तसेच प्रक्षेत्र भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी एकमेकांच्या
अनुभवांची देवाणघेवाण केली.
या कार्यक्रमास कृषी
विज्ञान केंद्राचे डॉ. दिपक कच्छवे, राहुल चव्हाण, डॉ. प्रमोद मगर, डॉ. नरेंद्र
देशमुख, पांढरकवडा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष जितेंद्रसिंह कोंगारेकर, तालुका
कृषी अधिकारी पांढरकवडा बळवंतकर, तालुका कृषी अधिकारी झरी-जामणी दासरवार, इफको
फर्टिलायझरचे संतोष फलटणकर तसेच परिसरातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
शेतकरी, कृषी विभाग,
कृषी शास्त्रज्ञ आणि विविध संस्थांमध्ये समन्वय साधून जिल्ह्याच्या कृषी विकासाला
चालना देण्याच्या दृष्टीने ही सभा महत्त्वपूर्ण ठरली.


Comments
Post a Comment