जलसंधारण दिनानिमित्त महा वॉकेथॉन स्पर्धा
समता मैदान येथे
आयोजन
महा वॉकेथॉनमध्ये
१० हजार स्पर्धकांची नोंदणी
युवकांसाठी रील
स्पर्धा
१० ते २५ हजार रुपयांपर्यंत पारितोषिक
यवतमाळ,
दि. 19 (जिमाका) : जलसंधारणाचे जनक म्हणून ओळख असलेले माजी मुख्यमंत्री
दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिवस २१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात “जलसंधारण दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त १५ ते २१ ऑगस्टदरम्यान
जलसंधारण सप्ताह, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान
राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ‘माती वाचवा, पाणी जपा, भविष्य सुरक्षित करा’
हा संदेश देत मृद व जलसंधारणाविषयी जनजागृती करण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी शहरातील समता
मैदान येथे ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही ‘महा वॉकेथॉन’ समता मैदान येथून सुरु होणार असून
ती कमाल ३ किलोमीटर अंतराची राहणार आहे. सकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान नोंदणी व शपथ कार्यक्रम
होणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता वॉकेथॉनला सुरुवात केली जाणार आहे. या वॉकेथॉनमध्ये
सहभागी स्पर्धकांना मृद व जलसंधारणाची शपथही दिली जाणार आहे.
महा वॉकेथॉनचा मार्ग
हा समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) - एसआयसी चौक- संविधान चौक (बस स्टॅंड चौक)- दत्त चौक- वीर वामनराव चौक - ॲंग्लो हिंदी चौक-
तहसिल चौक- पाच कंदील चौक - समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे समाप्त होणार आहे. या
वॉकेथॉन दरम्यान स्पर्धकांना टि-शर्ट, पाणी, बिस्कीट, फळे देण्यात येणार आहे.
१० हजार स्पर्धकांची नोंदणी
या महा वॉकेथॉनमध्ये
सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील १० हजार स्पर्धकांनी नोंदणी केली असून ते महा वॅाकेथॅानमध्ये
उपस्थित राहणार आहेत. नोंदणी प्रक्रिया व इतर अनुषंगिक कामांसाठी समता मैदानात मृद
व जलसंधारण विभागामार्फत २० स्टॅाल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाला प्रोत्साहन
देण्यासाठी प्रथम १० विजेत्यांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच ईश्वर
चिट्टीद्वारे प्रथम क्रमांकासाठी ₹२५,०००, द्वितीय क्रमांकासाठी ₹१५,००० आणि तृतीय
क्रमांकासाठी ₹१०,००० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच २५ सहभागी स्पर्धकांची
निवड करून त्यांना प्रत्येकी ₹३,००० विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. सहभागी नागरिकांना
ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
युवकांसाठी रील स्पर्धा
जलसंधारण दिनाच्या अभियानाला डिजिटल माध्यमातून लोकचळवळीचे स्वरूप देण्यासह
१५ ते ३० वयोगटातील युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर चॅलेंज’ स्पर्धा
आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मृद व जलसंधारणाचा संदेश देणारी ३० ते ६० सेकंदांची
इन्स्टाग्राम रील तयार करून त्याची लिंक
https://register.mahaevent.co.in या
पोर्टलवर समाविष्ट करावी लागणार आहे.
या रील स्पर्धेत
ईश्वर चिट्टीद्वारे जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार ₹२५ हजार व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार
₹१५ हजार व गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार ₹१० हजार व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे. पात्र
सहभागींना ई-प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना विशेष “युवा मृद-जलदूत”
म्हणून गौरविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा
आढावा
जलसंधारण दिनानिमित्त
आयोजित ‘महा वॅाकेथॅान’ च्या तयारी संदर्भात
जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बुधवारी आढावा घेतला. या महा वॅाकेथॅानमध्ये शाळा, महाविद्यालयातील
विद्यार्थी, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंदणी करुन सहभाग वाढवावा. वॅाकेथॅानच्या
मार्गावर साफसफाई, शौचालय, कचरा व्यवस्थापन, वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका, पार्किंग
व्यवस्था, पर्यायी वाहतूक मार्ग उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना
दिले.
कोट
“आपल्या पुढच्या पिढीसाठी माती आणि पाणी जपणे ही आपली
सामूहिक जबाबदारी आहे. जिल्ह्यातील युवकयुवती आणि नागरिकांनी महा वॉकेथॉन, रील स्पर्धेत
सहभागी होवून मृद व जलसंधारणाचा संदेश जिल्ह्यातील घराघरात पोहोचवावा. त्यासाठी एक
दिवस मृद व जलसंधारणासाठी देवूया आणि सुरक्षित भविष्य घडवूया.”
- पालकमंत्री संजय राठोड, यवतमाळ
“सध्या ग्लोबल वार्मिंग, हवामान बदल हे मोठे आव्हान
आहेत. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक असलेल्या कृषी क्षेत्रावर
होत आहे. त्यामुळे माती वाचवणे, पाणी जपणे काळाची गरज असून शासनाच्या जलसंधारण अभियानांतर्गत
महा वॅाकेथॅान स्पर्धा, युवकांसाठी रील स्पर्धांच्या माध्यमातून नव्या पिढीला माती
व जलसंरक्षणाचे महत्व जोपासण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील
युवकयुवती, नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
-जिल्हाधिकारी विकास मीना,, यवतमाळ


Comments
Post a Comment