अण्णासाहेब पाटील महामंडळाला ३०० कोटींचा निधी;
पात्र लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू
यवतमाळ, दि. 17
(जिमाका) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध
योजनांसाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र शासनाने केलेल्या अर्थसंकल्पीय
तरतुदीतून महामंडळाला नव्याने ३०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या
निधीतून पात्र लाभार्थ्यांच्या प्रलंबित व्याज परताव्याचे वितरण सुरू करण्यात आले
आहे. महामंडळाच्या विविध योजनांसाठी राज्य शासनाने सन २०२६-२७ साठी एकूण ७५० कोटी
रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. यापैकी यापूर्वी २० मे २०२६ रोजी १५० कोटी
रुपयांचा निधी महामंडळाला प्राप्त झाला होता. या निधीतून पात्र लाभार्थ्यांच्या
व्याज परताव्याची रक्कम वितरित करण्यात आली.
व्याज परताव्याची
प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी महामंडळाने ८ जुलै २०२६ रोजी शासनाकडे ५००
कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत
शासनाने ३ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित करून ३०० कोटी रुपयांचा निधी
मंजूर केला. त्यानुसार हा निधी ९ ऑगस्ट २०२६ रोजी महामंडळाच्या अधिकृत बँक खात्यात
जमा झाला. यापूर्वी प्राप्त झालेला १५० कोटी रुपयांचा निधी व नव्याने प्राप्त
झालेला ३०० कोटी रुपयांचा निधी असा एकूण ४०० कोटी रुपयांचा निधी या चालू आर्थिक
वर्षात महामंडळाला प्राप्त झाला आहे.
व्याज परताव्याचे २१
कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित
नव्याने प्राप्त झालेल्या निधीतून १० ऑगस्ट २०२६ रोजी सुमारे २१
कोटी रुपयांची व्याज परताव्याची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये
वितरित करण्यात आली आहे. उर्वरित पात्र व प्रलंबित प्रकरणांबाबत आवश्यक प्रशासकीय
व तांत्रिक कार्यवाही सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या बँक
खात्यात व्याज परताव्याची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.
यामुळे राज्यातील पात्र
लाभार्थी तसेच नवउद्योजकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, प्रलंबित व्याज परतावा
प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यासाठी महामंडळामार्फत कार्यवाही सुरु असल्याची
माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक
विजयसिंह देशमुख (भा.प्र.से.) यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment