जिल्ह्यातील 43,647 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचे 374 कोटी रुपये जमा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभ वितरित
> पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना
> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभ वितरित
> पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती
> शेतकऱ्यांना मोठा दिलासा
यवतमाळ, दि. 7 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास सुरुवात झाली असून, योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 5,029 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या लाभाचे वितरण करण्यात आले. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 43,647 शेतकऱ्यांच्या खात्यात 374 कोटी 31 लाख 43 हजार 481 रुपयांचा लाभ थेट जमा करण्यात आला आहे.
शेतकरी कर्जमुक्ती योजनेसंदर्भात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देताना येणाऱ्या अडचणी, प्रलंबित प्रकरणे तसेच पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषिमंत्री दत्ता भरणे, मंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे, आशिष जयस्वाल (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), मुख्य सचिव राजेश कुमार सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांच्यासह यवतमाळ येथून पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके, जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक ज्ञानेश्वर टापरे उपस्थित होते.
पालकमंत्री संजय राठोड यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल
यावेळी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याची मागणी केली. त्यामध्ये 2019 पूर्वीच्या वंचित राहिलेल्या शेतकरी, यंदाच्या योजनेतील विवाहानंतर नाव बदललेल्या महिला शेतकरी व आधार क्रमांकातील त्रुटी दुरुस्त करण्याची सुविधा तसेच, कर्जमुक्तीस पात्र शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अज्ञान पाल्यांनाही योजनेचा लाभ मिळावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी पालकमंत्री संजय राठोड यांनी केली. यासोबतच आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनीही चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत विविध मागण्या मांडल्या.
मंत्रिमंडळ उपसमितीत निर्णय घेणार
पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी मांडलेल्या मागण्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. या मागण्यांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
0000
.jpeg)




Comments
Post a Comment