‘एसआयआर’ची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध ; जिल्ह्यात १९.८८ लाख मतदार
> दावे व हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
> ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
यवतमाळ, दि. ३१ (जिमाका) : भारत निवडणूक
आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व सात विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील
सातही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी आज, दि. ३१ ऑगस्ट रोजी संबंधित मतदान
केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण
कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुष, महिला व तृतीयपंथी
मतदारांचा समावेश आहे. मतदारसंघनिहाय तपशील संबंधित मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात
आला आहे. जिल्ह्यातील नागरिक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच संबंधित सर्व घटकांनी
प्रारूप मतदार यादी तपासून आपल्या नावाची नोंद, पत्ता व इतर तपशील अचूक असल्याची खात्री
करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
सात विधानसभा मतदारसंघातील प्रारूप मतदार यादीनुसार ७६-वणी मतदारसंघात
१ लाख ३२ हजार १८८ पुरुष व १ लाख २४ हजार ११७ महिला मतदार असून एकूण २ लाख ५६ हजार
३०५ मतदारांची नोंद झाली आहेत. ७७-राळेगाव (अ.ज.) मतदारसंघात १ लाख ३३ हजार ४८५ पुरुष,
१ लाख २७ हजार ६१४ महिला व १ तृतीयपंथी मतदार असून एकूण २ लाख ६१ हजार १०० मतदार आहेत.
७८-यवतमाळ विधानसभा मतदारसंघात १ लाख ४८ हजार ८६४ पुरुष, १ लाख ४४ हजार २४७ महिला व
२० तृतीयपंथी मतदार असून एकूण २ लाख ९३ हजार १३४ मतदार आहेत. ७९-दिग्रस विधानसभा मतदारसंघात
१ लाख ६१ हजार ६४५ पुरुष, १ लाख ५१ हजार ७०९ महिला व ११ तृतीयपंथी मतदार असून एकूण
३ लाख १३ हजार ३६५ मतदार आहेत. ८०-आर्णी (अ.ज.) मतदारसंघात १ लाख ४७ हजार ३३० पुरुष,
१ लाख ३८ हजार ६३२ महिला व २ तृतीयपंथी मतदार असून एकूण २ लाख ८५ हजार ९६४ मतदार आहेत.
८१-पुसद मतदारसंघात १ लाख ४९ हजार ३०० पुरुष, १ लाख ३८ हजार ५६८ महिला व ८ तृतीयपंथी
मतदारांची नोंद झाली असून एकूण २ लाख ८७ हजार ८७६ मतदार आहेत. ८२-उमरखेड (अ.जा.) विधानसभा
मतदारसंघात १ लाख ४ हजार ९४ पुरुष, १ लाख ३६ हजार ३७० महिला व ३ तृतीयपंथी मतदार असून
एकूण २ लाख ९० हजार ४६७ मतदार आहेत. या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्यात
एकूण १० लाख २२ हजार ९०६ पुरुष, ९ लाख ६५ हजार २५७ महिला आणि ४५ तृतीयपंथी मतदार आहेत.
जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण १९ लाख ८८ हजार २८८ मतदार असल्याची
नोंद झाली आहे.
दावे व हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
झाल्यानंतर नागरिकांना आपल्या नावाबाबत दावे व हरकती कालावधी दि. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.
प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा दि. ३१ ऑगस्ट
ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम मतदार यादी
दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दावे व हरकतींची यादी दर आठवड्याला प्रसिद्ध होणार
नागरिक तसेच राजकीय पक्षांच्या माहितीसाठी
प्राप्त झालेले दावे व हरकतींची यादी दर आठवड्याला संबंधित मतदार नोंदणी अधिकारी व
सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात
प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध
करून देण्यात येणार आहे.
नाव वगळल्यास अपीलाची संधी
या प्रारूप मतदार यादीत एखाद्या
मतदाराचे नाव अनावधानाने वगळले गेले असल्यास किंवा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध
आक्षेप अथवा तक्रार असल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील तरतुदींनुसार अपील
दाखल करता येणार आहे. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकारी
तथा जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्याकडे निर्णयाच्या १५ दिवसांच्या आत प्रथम अपील दाखल
करता येणार आहे. प्रथम अपीलीय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे निर्णयाच्या
३० दिवसांच्या आत द्वितीय अपील दाखल करता येणार आहे.
मतदारांनी प्रारूप मतदार यादीत नाव असल्याची खात्री करावी - जिल्हाधिकारी विकास मीना
जिल्ह्यातील सर्व नागरिक, राजकीय पक्ष
व त्यांच्या प्रतिनिधींनी संबंधित मतदान केंद्र, तहसील कार्यालय अथवा उपविभागीय कार्यालयात
प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी पाहून घ्यावी. नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी
करण्यासाठी नमुना ६, मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी नमुना ७, तर मतदार यादीतील दुरुस्ती
अथवा पत्ता बदलासाठी नमुना ८ भरून विहित मुदतीत सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी
तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
Comments
Post a Comment