बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
यवतमाळ दि.27 (जिमाका) : मुंबई उच्च
न्यायालयातील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सामाईक न्यूनतम
कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि राणी लक्ष्मीबाई विद्यालय
यांच्या संयुक्त विद्यमाने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायदा, २०१२ या
विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य
विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांच्या
मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश
वरिष्ठ स्तर, यवतमाळ दीपक एच. दाभाडे यांच्या पुढाकाराने २४ ऑगस्ट रोजी राणी
लक्ष्मीबाई विद्यालयात हा शिबिर घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे
मुख्याध्यापक प्रसाद कुलकर्णी होते. प्रमुख वक्ते म्हणून सहायक लोकअभिरक्षक तृप्ती
आसवा आणि जिल्हा ग्रामिण समस्या मुक्ती ट्रस्ट, यवतमाळच्या जिल्हा समुपदेशक माधुरी
कोटेवार उपस्थित होत्या.
यावेळी प्रमुख वक्त्या तृप्ती आसवा यांनी मुला-मुलींसोबत होणारे
अत्याचार, त्यासंदर्भातील विविध कायदे, तक्रार करण्यासाठी उपलब्ध दूरध्वनी क्रमांक
तसेच पीडित मुलींचे योग्य पद्धतीने समुपदेशन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले.
बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, २०१२ तसेच विधी सेवा प्राधिकरण कायदा, १९८७
याबाबतही त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या वक्त्या माधुरी कोटेवार यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक
कायदा, २०१२ याबाबत सविस्तर मार्गदर्शन करताना मुलींना चांगला स्पर्श आणि वाईट
स्पर्श यातील फरक कसा ओळखावा याची माहिती दिली. तसेच असा प्रकार घडत असल्यास
विद्यार्थीनींनी तो लपवून न ठेवता तातडीने आपल्या शिक्षक, आई-वडील किंवा
विश्वासातील व्यक्तीच्या निदर्शनास आणून देण्याचा सल्ला त्यांनी दिला.
लहान मुलांचे अधिकार, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी उपलब्ध मदत
तसेच प्रत्येक मुल कसे सुरक्षित राहील याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. फेसबुक,
इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांद्वारे मुलींना वेगवेगळ्या पद्धतीने
कसे फसविले जाते याचे उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थिनींना सावधगिरी बाळगण्याबाबत
व अनुचित प्रकाराबाबत शिक्षक, पालकांना निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले. या
ग्रामीण भागांतून येणाऱ्या मुली बसमधून येतांना त्यांना मुले किंवा माणसे धक्का
मारतात तर त्याबाबत आपण संबंधीत व्यक्तीला निर्देशानास आणून देणे किती गरजेचे आहे
याबाबत माहिती दिली. आई-वडीलांनी सुध्दा आपल्या मुला-मुलींकडे लक्ष देणे किती
महत्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment