यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी ! शेती तंत्रज्ञानाची माहिती, शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा आणि क्षेत्रीय भेटी होणार

> शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान > शेतकऱ्यांनी १४ ऑगस्टपूर्वी प्रस्ताव सादर करावा > कृषी विभागाचे आवाहन यवतमाळ, दि. ४ (जिमाका) : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशातील शेती विषयक तंत्रज्ञान, त्याचा अवलंब व उत्पन्नातील वाढीबाबत तसेच परदेशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय व संस्थांना भेटीसाठी देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शासनाकडून अभ्यास दौऱ्यासाठी सर्व घटकातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपये यापैकी जे कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. शेतकरी निवडीचे निकष: या योजनेंतर्गत शेतकरी निवडीचे निकष ठरविण्यात आले आहेत. त्याप्रमाणे अभ्यास दौऱ्यासाठी जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. शेतकऱ्याचा ॲग्रीस्टॅकअंतर्गत फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याचे उत्पन्नचे मुख्य साधन शेती असावी व तसे त्याने स्वयंघोषणा प्रपत्र पत्रात नमूद करावे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना स्वखर्चाने कुटुंबातील इतर सदस्यास सोबत घ्यायचे असले तरी सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही. सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी. कुटूंब या व्याख्येमध्ये पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील मुले/मुली यांचा समावेश होतो. शेतकऱ्याने त्याच्या आधार कार्डाची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी किमान २५ वर्षे पूर्ण असावे. कमाल वयाची अट नाही परंतु शेतकरी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे बंधनकारक आहे. यासाठी या योजनेत सहभागी होण्यास अर्ज सादर करताना शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे किमान एमबीबीएस डॉक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे. शेतकऱ्यांची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र कृषी विभागाकडून मिळाल्यानंतर देखील शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे किमान एमबीबीएस डॉक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे. कोरोना विषयक तपासणी करुन तसा अहवाल कृषी आयुक्तालयात सादर करणे बंधनकारक आहे. या अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग ७ ते १० दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारीरिक दृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे बंधनकारक राहील. या अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सात ते दहा दिवस कालावधीच्या परदेश दौरा करण्यासाठी शारीरिक दृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट)असावा. पुराव्यासाठी पारपत्राची मुदत/वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी. पार पत्राची वैध मुदत दौरा निघण्यापूर्वी किमान एक वर्ष असावी. शेतकरी शासकीय निम शासकीय, सहकारी, खाजगी, संस्थेत नोकरीत नसावा, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार इत्यादी नसावा तसे त्यांने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमुद करावे. शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. तसेच त्यांनी स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. शेतकरी निवडी बाबत अंतिम अधिकार राज्यस्तरीय समितीकडे राखीव असतील. कागदपत्र कोणती लागतात ? प्रस्ताव, फार्मर आयडी, शेती व्यवसायाचे स्वयंघोषणा प्रपत्र शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, एमबीबीएस डॉक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र, कोरोना तपासणी अहवाल, शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट), स्वयंघोषणापत्र इ कागदपत्रे असणे आवश्यक आहे. पाच शेतकऱ्यांना संधी ; १४ ऑगस्टपर्यंत मुदत या योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी पाच शेतकऱ्यांचे लक्षांक प्राप्त आहे. अनुदानाच्या तपशीलाविषयी सविस्तर माहिती, शेतकरी निवडीची कार्यपद्धती, शेतकऱ्यांनी पाळावयाच्या अटी व शर्ती इत्यादीबाबत अधिक माहिती संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त करता येणार आहे. तसेच दौऱ्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर परिपूर्ण प्रस्ताव १४ ऑगस्टपूर्वी सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. १९ ऑगस्टला सोडत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयात यवतमाळ येथे प्रस्तावाची सोडत काढण्यात येणार आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान