केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून सामाजिक न्याय योजनांचा आढावा
पीक विम्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार
- रामदास आठवले
यवतमाळ,
दि. 20 (जिमाका) : जिल्ह्यातील विविध विषयांसह केंद्र व राज्य शासनाच्या
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांबाबत केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री
रामदास आठवले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे सविस्तर आढावा घेतला.
बैठकीस जिल्हाधिकारी
विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे
प्रकल्प अधिकारी आनंद इंगले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी युवराज म्हेत्रे, जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी मनोज ढगे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मंगला मुन, नगरविकासचे येमाजी धुमाळ
यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार व पदाधिकारी उपस्थित
होते.
राज्यमंत्री रामदास
आठवले यांनी यवतमाळसह राज्यातील पीक विम्यापासून वंचित जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना योजनेचा
लाभ मिळावा, यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे पाठपुरावा करणार
असल्याचे सांगितले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासाठी ५ कोटी प्रस्तावित
या बैठकीत केंद्रीय
राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई
फुले यांचा पुतळा उभारण्याबाबतही माहिती घेतली. या पुतळ्यासाठी ८९४८ चौ. फूट जागा शासन
जमा करण्यात आली असून नगरपरिषदेला हस्तांतरित करावी. तसेच पुतळा समितीची बैठक घेऊन
प्रस्ताव शासनाकडे पाठवावा असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी पुतळा, वाचनालय व इतर
अनुषंगिक कामांसाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असल्याची माहिती देण्यात
आली.
यावेळी जिल्ह्यातील
अॅट्रॉसिटी प्रकरणांचा आढावा घेताना प्रकरणातील मृतांच्या २४ वारसांना शासकीय सेवेत
सामावून घेतल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
भूमिहीनांना कसण्यासाठी गायरान, भूदान तसेच झुडपी जंगलाच्या जमिनी उपलब्ध
करून देण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
शिष्यवृत्ती व जात पडताळणीचा आढावा
विद्यार्थ्यांसाठी
केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांची तसेच जात पडताळणी प्रकरणांचीही राज्यमंत्री
आठवले यांनी माहिती घेतली. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत
वाढ करण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जात पडताळणीची एकूण
१,९५४ प्रकरणे असून त्यापैकी १,२०० प्रकरणे तयार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
उर्वरित प्रकरणांतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत
असल्याचेही सांगण्यात आले.
चिंचोली संगम पुनर्वसनाचा नव्याने प्रस्ताव
उमरखेड तालुक्यातील
चिंचोली संगम येथील पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी नव्याने प्रस्ताव तयार करून शासनास
सादर करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या. शासन या विषयावर
सकारात्मक असून संबंधितांना प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात
येणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
यावेळी सामाजिक न्याय
विभागांतर्गत सुरू असलेल्या मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थी संख्या,
वसतिगृहांची क्षमता तसेच निवासी आश्रमशाळांची माहिती घेण्यात आली. याशिवाय प्रधानमंत्री
जनधन योजना, मुद्रा कर्ज, उज्ज्वला योजना, रमाई आवास, पीएम आवास योजना, आंतरजातीय विवाह,
दिव्यांग, सफाई कामगार, वृद्धाश्रम तसेच साहित्यिक व कलावंतांच्या मानधनाच्या प्रकरणांचाही
आढावा घेण्यात आला.
Comments
Post a Comment