महा वॉकेथॉन-‘वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

 

२१ ऑगस्टला राज्यभर आयोजन; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 17 (जिमाका) : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टूमारो’ (Save Soil, Save Water, Secure Tomorrow) ही या उपक्रमाची थीम असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे घोषवाक्य आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जास्तीत जास्त तीन किलोमीटर अंतराची वॉकेथॉन आयोजित करण्यात येणार असून, त्यानंतर सहभागींकडून मृद व जलसंधारणाची शपथ घेण्यात येणार आहे.

मंत्री संजय राठोड म्हणाले, शाश्वत विकासासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ दरम्यान ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सर्व घटकांचा सहभाग

राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे होणार असून प्रत्येक जिल्ह्यातील कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत. या उपक्रमात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, खेळाडू, विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी व लायन्स क्लब, रनिंग व सायकलिंग क्लब, उद्योग-व्यापारी संघटना, सीएसआर भागीदार, विविध क्रीडा संघटना, व्यायामशाळा, महिला आणि राज्यातील नागरिक सहभागी होणार आहेत.

क्यूआर कोडद्वारे नोंदणी

महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड आधारित ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

प्रायोजकांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात एकूण ६५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये व गौरवचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये व गौरवचिन्ह आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये व गौरवचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्यक्ष सहभागींपैकी ईश्वरी चिठ्ठीद्वारे निवडलेल्या सात सहभागींना प्रत्येकी तीन हजार रुपयांचे विशेष बक्षीस देण्यात येणार आहे.

या उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियावर #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSaveWater या हॅशटॅगचा वापर करण्याचे आवाहनही मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

Comments