माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी युवकांची ‘रील’मधून जनजागृती
१५ ते १९ ऑगस्टदरम्यान ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा
यवतमाळ, दि. 17 (जिमाका) : माती आणि जलसंधारणाचा
संदेश युवकांपर्यंत तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील
सर्व ३६ जिल्ह्यांत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ ही राज्यस्तरीय रील
स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींना या
स्पर्धेत सहभागी होता येणार असून १५ ते २२ ऑगस्टदरम्यान रील अपलोड करता येणार आहे.
स्पर्धकांनी ३० ते ६० सेकंदांची इन्स्टाग्राम रील तयार करून आपल्या
पब्लिक इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करायची आहे. रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश,
स्वतःचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. मृद व जलसंधारण
विभागाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करणे तसेच ‘#SaveSoilSaveWater’ हा
हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे.
स्पर्धेसाठी क्यूआर कोडद्वारे नोंदणी, रील लिंक सबमिट, जिल्हा
निवड, व्हेरिफिकेशन आणि सहभाग प्रमाणपत्र अशी प्रक्रिया राहणार आहे. माती संवर्धन,
पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट
क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन तसेच गावातील यशस्वी मृद व
जलसंधारणाची कामे या विषयांवर रील तयार करता येणार आहे.
स्टोरीटेलिंग, ॲक्टिंग, म्युझिक, डान्स, ॲनिमेशन, शॉर्ट फिल्म,
बिफोर-आफ्टर आणि ड्रोन व्हिज्युअल्स यांसारख्या सर्जनशील पद्धतींचाही वापर करता
येणार आहे. मात्र रीलचा मुख्य संदेश माती आणि पाणी संवर्धनाशी संबंधित असणे आवश्यक
आहे.
स्पर्धेचे परीक्षण विषय व संदेश, कल्पकता, प्रभावी सामाजिक संदेश,
सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता तसेच इन्स्टाग्राम एंगेजमेंट या निकषांवर करण्यात
येणार आहे. केवळ लाईक्स किंवा फॉलोअर्सच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाणार
नाही. तर संदेश महत्वाचा असणार आहे.
जिल्हास्तरावर प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि
१० हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. याशिवाय विजेत्यांना ‘महाराष्ट्र
युवा जलदूत’ म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून उत्कृष्ट
सहभागींना ई-सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
युवक, विद्यार्थी, इन्स्टाग्राम क्रिएटर्स, यूट्यूबर्स आणि सोशल
मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन माती आणि पाणी संवर्धनाचा
संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाच्या
वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment