उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाच्या निवडीसाठी तालुकास्तरीय निवडी समिती गठीत

 


यवतमाळ, दि. 25 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सन 2026 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत तालुक्यातून एक उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी तालुकास्तरीय निवड समिती गठीत करण्यात आली आहे.

समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता, पोलीस निरीक्षक आणि संबंधित नगर परिषद अथवा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे शासकीय सदस्य असतील. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. याशिवाय समितीत दोन अशासकीय सदस्यांचाही समावेश करण्यात येणार आहे.

स्पर्धेत केवळ संबंधित यंत्रणेकडे नोंदणीकृत अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाच सहभागी होता येणार आहे. पात्र मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे विहित मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

दरम्यान, मागील सलग दोन वर्षांत राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त केलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यंदाच्या पारितोषिकासाठी पात्र राहणार नाहीत. इतर मंडळांना संधी मिळावी, या उद्देशाने ही अट लागू करण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंडळांना ही अट लागू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तालुकास्तरीय समिती सहभागी मंडळांच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन जी पी एस टॅग असलेले उच्च दर्जाचे छायाचित्रण व व्हिडीओ रेकॉर्डिंग करणार आहे. तसेच मंडळाची आवश्यक कागदपत्रे जमा करून शासन निर्णयात नमूद निकषांनुसार परीक्षण केले जाणार आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार अभिप्रायासह गुणांकन करून तालुक्यातून एका उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात येईल.

निवड झालेल्या मंडळाची जिल्हास्तरीय परीक्षणासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे शिफारस केली जाणार आहे. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कोणत्याही परिस्थितीत विभागून देता येणार नसल्याने समितीने याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समान गुण मिळाल्यास ज्या मंडळाची स्थापना अधिक वर्षांपूर्वी झालेली आहे, त्या मंडळाला पारितोषिकासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

तालुकास्तरीय विजेत्या मंडळाची शिफारस करताना आवश्यक कागदपत्रे, वर्षभरातील सामाजिक व इतर उपक्रमांची तसेच चालू गणेशोत्सवातील कामांची जी पी एस टॅग छायाचित्रे, परीक्षण अहवाल आणि प्रत्यक्ष परीक्षणादरम्यान केलेले छायाचित्रण व व्हिडीओ जिल्हास्तरीय समितीकडे सादर करणे बंधनकारक राहणार आहे. शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करण्याची जबाबदारीही तालुकास्तरीय समितीवर राहणार आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित