विद्यार्थ्यांनो, स्वाधार योजनेसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ! तत्काळ अर्ज करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि.९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन नूतनीकरण अर्ज सादर करण्यास १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप अर्ज सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याण विभाग यवतमाळ यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील इयत्ता अकरावीपासून पुढील व्यावसायिक तसेच बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी समाजकल्याण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते. शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळण्यास पात्र असूनही जागांच्या अभावामुळे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य दिले जाते. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
कोणाला करता येणार अर्ज?
सन २०२५-२६ या मागील शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षासाठी नूतनीकरणाचा अर्ज करता येणार आहे. यामध्ये यापूर्वीपासून योजनेचा लाभ घेणारे तसेच मागील वर्षी प्रथम वर्षासाठी अर्ज केलेले विद्यार्थी समाविष्ट आहेत. या विद्यार्थ्यांसाठी नूतनीकरण अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्ज भरताना मागील शैक्षणिक वर्षाचे गुणपत्रक आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी आणि अंतिम मुदतीची वाट न पाहता अर्ज सादर करावा.
निवास व निर्वाहासाठी आर्थिक मदत
स्वाधार योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना घरभाडे, भोजन, निवास आणि निर्वाहासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपालिका हद्दीपासून पाच किलोमीटरच्या परिसरातील महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ दिला जातो. उच्च शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळावा आणि त्यांचे शिक्षण सुरळीत सुरू राहावे, यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे.
बॉक्स
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नूतनीकरण अर्ज सादर करण्यास १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया निर्धारित मुदतीत पूर्ण करावी. मुदतीनंतर अर्ज सादर करण्याची संधी मिळेलच असे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता तातडीने अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा.” - मंगला मून, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, यवतमाळ.
000
Comments
Post a Comment