मेडीएशन फॉर नेशन ३.० अंतर्गत मोहीम सुरू
आठवड्यातील सर्व दिवस मध्यस्थीद्वारे तडजोडीचे प्रयत्न;
प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 7 (जिमाका):
यवतमाळ : राष्ट्रीय
विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच मध्यस्थी आणि सलोखा समिती आणि महाराष्ट्र राज्य
विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार ‘मेडिएशन फॉर नेशन
३.०’ या मोहिमेला सुरुवात झाली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी
सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आनंद एल. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय
तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये तडजोडीस पात्र प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी
मध्यस्थी मोहीम राबविण्यात येत आहे.
तालुका न्यायालयांपासून उच्च न्यायालयांपर्यंत न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे
प्रलंबित असलेली दिवाणी, कौटुंबिक, व्यावसायिक आणि इतर तडजोडपात्र प्रकरणे परस्पर संमतीने
आणि कायदेशीर प्रक्रियेद्वारे मध्यस्थी करून तंटा सोडविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात
आली आहे.प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी आणि वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी ही लोकांसाठी
अनुकूल, किफायतशीर आणि जलद प्रक्रिया असून नातेसंबंध, वेळ आणि पैसा वाचवण्यास सक्षम
आहे.
मध्यस्थीसाठी पात्र असलेल्या प्रलंबित प्रकरणांच्या स्वरूपामध्ये वैवाहिक
वाद, अपघात दावे, घरगुती हिंसाचार, चेक बाउन्स, व्यावसायिक वाद, सेवा प्रकरणे, ग्राहक
वाद आणि बेदखल करणे यांचा समावेश आहे.
या मोहिमेत पक्षकारांच्या सोयीनुसार आठवड्याचे सर्व दिवस मध्यस्थीद्वारे
तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जातील. तसेच प्रकरणे निकाली काढण्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया
ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने केली जाऊ शकते. त्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,
यवतमाळद्वारे ऑनलाइन सुविधा उपलब्ध असेल.
तरी न्यायालयात प्रलंबित असलेले वाद विनाखर्च, कमी वेळेत आणि सन्मानपूर्वक
मिटविण्यासाठी सर्व पक्षकारांनी आपली प्रकरणे मध्यस्थीकडे पाठविण्यासाठी संबंधित न्यायालयाशी
संपर्क साधावा व आपली प्रकरणे सामंजस्याने वाद निकाली काढावेत, असे आवाहन करण्यात आले
आहे.
Comments
Post a Comment