वन जमिनीवरील अतिक्रमणाचा
प्रश्न निकाली काढू
-किशोर तिवारी
* नागरीकांनी कायदा
हातात घेऊ नये
*शासनाच्या योजनांचा फायदा घ्यावा
*लाभार्थ्यांची यादी करण्याचे निर्देश
यवतमाळ, दि. 2 : वन जमिनीवरील गावातील नागरीकांचे अतिक्रमण
काढण्यासाठी आलेल्या वन अधिकाऱ्यांवर गावातील नागरीकांनी हल्ला केला. हा प्रश्न सनदशिर
मार्गाने निकाली काढून ही घटना टाळता आली असती. वन जमिनीवरील हक्कांचे दावे जिल्हास्तरीय
समितीकडे प्रलंबित असताना अतिक्रमण काढण्याची घाई वन अधिकाऱ्यांनी करू नये. वन जमिनीवरील
अतिक्रमाणाचा प्रश्न समोपचाराने निकाली काढू, असे आश्वासन कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन
मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी दिले. शुक्रवारी, दि. 1 जुलै रोजी पांढरकवडा तालुक्यातील
खैरी येथे आयोजित सरकार आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री. तिवारी म्हणाले, शासनाच्या नियमानुसार 2005 पूर्वी
वन जमिनीवर अतिक्रमण असल्यास ते नियमित करून त्याचे पट्टे वाटप करावे लागणार आहे. खैरी
येथील वन जमिनीचा प्रश्न जिल्हास्तरीय समितीकडे प्रलंबित असताना वन विभागाने अतिक्रमण
काढण्याची घाई केली आहे. यामुळे पिकांचे नुकसान झाले असून त्याची भरपाई देण्यात येईल.
याबाबत नागरीकांनी सहकार्याची भुमिका स्विकारावी, याप्रकरणी उपविभागीय अधिकारी हे न्यायालयीन
चौकशी करणार असून नागरीकांनी याबाबतचे पुरावे गोळा करून ठेवावे. चौकशी अहवाल तयार करताना
नागरीकांचे बयाणही घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागरीकांनी कोणावरही विश्वास न ठेवता
जिल्हास्तरीय समिती जे निर्देश देतील, त्याप्रमाणे कार्यवाही करावी, असे सांगितले.
नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकारी गावात येत आहे.
त्यामुळे नागरीकांनी आता आपल्या हक्काप्रती जागरूक होणे गरजेचे आहे. गावातील आदिवासी
आणि शेतकऱ्यांना अन्नधान्य मिळणे गरजेचे आहे. नागरीकांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य
मिळाले नसल्यास दुकानदारावर गुन्हे नोंदविण्यात येतील. गावातील नागरीकांना गावातच रोजगार
मिळावा, यासाठी रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करावीत. तसेच आरोग्याच्या सुविधा गावात
मिळाव्यात, यासाठी प्राथमिक उपकेंद्र तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी लागणारी दाखले सर्वांना मिळाले पाहिजे. त्यासाठी ग्रामसेवकांनी
प्रस्ताव तयार करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
श्री. तिवारी यांनी गावातील वीज, रस्ते, सार्वजनिक अन्न धान्य
वितरण व्यवस्था, आरोग्य, घरकुल, विविध शासकीय योजनांचा लाभ आदींची माहिती घेतली. शासकीय
योजनांचा लाभ देण्यासाठी ग्रामसेवकांनी प्रत्येक गटनिहाय लाभार्थ्यांची यादी तयार करावी,
त्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
उपविभागीय अधिकारी दिपककुमार मिना यांनी शासनाची निराधार
आणि अपंग योनजेसाठी मिळणाऱ्या अनुदानासाठी प्रस्ताव पाठवावे असे आवाहन केले. तसेच गावातील
प्रत्येक लाभार्थ्याची यादी ग्रामपंचायतीमध्ये लावावी. ठक्करबाप्पा योजनेतून गावातील
महत्त्वाची कामे हाती घेता येणे शक्य आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव पाठवावा, असे
आवाहन केले. वन जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न सोडविण्यासाठी गावातील नागरीकांचे बयाण
घेतल्या जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पांढरकवडा पंचायत समितीचे अध्यक्ष मानारेड्डी पानजवार,
उपविभागीय अधिकारी दिपककुमार मिना, उपविभागीय कृषि अधिकारी श्री. सातपुते तहसिलदार
श्री. जोरवार, गटविकास अधिकारी श्री. घसाळकर, आदी उपस्थित होते.
00000

Comments
Post a Comment