परंपरागत शेतीचा आवळगाव पॅटर्नला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद
*झरी तालुक्यातील ५० आदिवासी कुटुंबांना देशी कापूस बियाणे वाटप
यवतमाळ, दि. 5 : मारेगाव तालुक्यातील आवळगाव येथे कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, कृषि विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांच्यातर्फे बिगर बीटी देशी कापूस बियाणे उत्पादनाचा अभिनव कार्यक्रम ११३ आदिवासी शेतकऱ्याच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. झरी तालुक्यातील ५० आदिवासी कुटुंबांना देशी कापूस बियाणे वाटप करण्यात आले असून या आवळगाव पॅटर्नला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे.
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष श्री. किशोर तिवारी यांच्या प्रयत्नातून झरी तालुक्यातील हिवरा बा., कटली बोरगाव, पालगाव, बोटोनी, पाचपोर या गावातील ५० शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने बिगर बीटी कापूस बियाणे उत्पादन कार्यक्रम राबविण्याचा मानस दर्शविला.
 यासाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गायकवाड, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सी. यू. पाटील यांनी बिगर बीटी बियाणे उपलब्ध करून दिले. कृषि दिनाचे औचित्य साधून पांढरकवडा येथील उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयात श्री. तिवारी यांच्या हस्ते बिगर बीटी कापूस बियाणे वाटप आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
श्री. तिवारी यांनी पारंपारिक शेतीचा आवळगाव पॅटर्न राज्यभर राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. क्षेत्रात कापसाच्या बीटी बियाण्याचा वापर, कृषि निविष्ठेकरिता बाजारावरील अवलंबित्व यामुळे शेतीतील नफा कमी होत आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वावलंबी शाश्वत शेतीची कास धरून, वाटप करण्यात आलेल्या बियाण्यातून बियाणे उत्पादित करून, गावात ‘देशी कापसाची बियाणे बँक’ उभारण्याचे आवाहन केले.
पांढरकवडा येथील उपविभागीय कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी अतिघनता कापूस लागवड आणि बियाणे उत्पादन कार्यक्रमाविषय माहिती दिली. आजही शेतकरी स्वयंस्फुर्तीने देशी कापूस बियाणे उत्पादन  करण्यास इच्छुक असल्यास त्यांना कृषि विभागामार्फत बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याकरिता कृषि विभाग सदैव तत्पर राहिल अशी ग्वाही दिली.
कृषि दिनानिमित्त उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय परिसरात श्री. तिवारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मा आत्राम, मुन्ना बोलेनवार, अंकित नैताम, मोहन जाधव, तंत्र अधिकारी एम. बी. गोंधळी, कृषि अधिकारी सोनाली कवडे, निलेश ओळंबे, कृषि सहायक श्रीमती ए. एच. बोके. गजानन कोरे आदी उपस्थित होते. रोहित राठोड यांनी सूत्रसंचालन केले.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती