बँकांतील दलालांवर अंकुश लावणार
*पाटणबोरी येथील घटनेची पुन:रावृत्ती नको
यवतमाळ, दि. 2 : पाटणबोरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट कर्ज वाटप केले आहे. मात्र शेतकऱ्याला मारहाण केल्यामुळे त्यांचे हे यश झाकल्या गेले आहे. या घटनेची पुन:रावृत्ती होणार नाही, यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यासह शेतकऱ्यांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. तसेच बँकांमध्ये पिककर्ज काढून देण्यासाठी दलालांची टोळी सक्रिय असल्याने यापुढे बँकांमध्ये दलाल आढळल्यास बॅंकांवरच गुन्हे नोंदविण्यात येतील, असे प्रतिपादन कै. वसंतराव नाईक स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले. ते पाटणबोरी येथील ग्रामपंचायतीमध्ये शुक्रवारी, दि. 1 जुलै रोजी आयोजित सुलभ पिक कर्ज मेळाव्यात बोलत होते.
श्री. तिवारी म्हणाले, स्टेट बँकेच्या पाटणबोरी शाखेने 816 शेतकऱ्यांना सुमारे आठ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट असून पिककर्ज तीन कोटीने जादा वाटप केले आहे. परिसरातील आणि जिल्ह्यातील इतर बँकांशी तुलना करता हा आकडा निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र केवळ एका शेतकऱ्याला मारहाण केल्यामुळे या शाखेची बदनामी झाली आहे. शासन चांगले काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, मात्र अशा प्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
गेल्या दोन वर्षांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले आहे, तसेच नवीन कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीही आडकाठी येऊ नये, याच्या सुचना शासनाच्या वतीने बँकांना देण्यात आल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 15 जुलै पर्यंत कर्ज मिळण्यासाठी ग्रामपंचायतींनी सहकार्य करावे. पिक विम्याची रक्कम देताना सर्व्हेक्षण चुकीच्या पद्धतीने झाले असल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे येत्या काळात योग्य पद्धतीने सर्व्हे करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.
सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. तसेच 2014 पूर्वी थकीत कर्ज असलेल्यांचाही प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. असे असताना बँकांमध्ये कर्ज काढून देण्यासाठी दलालांची टोळी सक्रिय आहे. या दलालांमार्फत जाणाऱ्या पिककर्जाच्या अर्जावर तातडीने कारवाई होऊन कर्ज मंजूर होत आहे, दलालांशिवाय आलेले अर्ज प्रलंबित राहत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे. बँकांमध्ये अशा प्रकारचे दलाल आढल्यास नागरीकांनी पुराव्यासह तक्रारी कराव्यात, त्या व्यक्तीसोबतच संबंधित बँकांवर गुन्हे नोंदविण्यात येणार आहे. अशा प्रकारचे वाद उद्भवल्यास गावाची एक समिती करून त्याच‍ ठिकाणी हे वाद मिटवावे, असे श्री. तिवारी यांनी सांगितले.
पाटणबोरी आरोग्य केंद्राला भेट
            दौऱ्यादरम्यान श्री. तिवारी यांनी पाटणबोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रात असलेल्या सोयी-सुविधांची माहिती घेतली. केंद्राची इमारत गावाच्या मध्यवस्तीत आहे. त्यामुळे या ठिकाणी चांगल्या सोयी निर्माण झाल्यास रूग्णांची संख्या वाढण्यास मदत होईल, असेही श्री. तिवारी यांनी सांगितले. केंद्राच्या परिसरातच निवासस्थानांची असलेली स्थिती सुधारल्याशिवाय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करू नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले. येत्या काळात केंद्राने औषधाचा साठा पुरेशा प्रमाणात ठेऊन साथरोग आल्यास त्यासाठी उपाययोजना आधीच कराव्यात, अशा सूचना केल्या.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती