पालकमंत्र्यांच्याहस्ते सिंचन व्यवस्थापन मंडळ कार्यालयाचे उद्घाटन
* जलसंपदाचे आता दोन अधिक्षक अभियंता
* जिल्ह्यात सिंचन व्यवस्थापनाला गती येणार
       यवतमाळ, दि.1 : जिल्ह्यातील सिंचन व्यवस्थेला गती देण्यासाठी जिल्ह्यात शासनाने नुकतेच जलसंपदा व्यवस्थापनाचे अधिक्षक अभियंता दर्जाचे नवीन कार्यालय मंजूर केले असून पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते या कार्यालयाचे आज उद्घाटन झाले. विश्रामगृहा शेजारी असलेल्या जलसंपदाच्या ईमारतीत हे मंडळ कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
            यावेळी आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलिस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, जलसंपदाचे मुख्य अभियंता दि.दे.पोहेकर, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, कार्यकारी अभियंता अनंत गोरडे, भाष्कर चाटे, श्री.वद्देवार, श्री.ढोबळे, आत्माचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे आदी उपस्थित होते. या मंडळाचे अधिक्षक अभियंता म्हणून राजेंद्र काटपल्लीवार हे अतिरिक्त कार्यभार पाहणार आहे.
            जिल्ह्यातील सिंचन क्षमतेचा योग्य वापर होण्यासाठी स्वतंत्र मंडळ कार्यालय सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्याप्रमाणे सांगली येथे कार्यरत कृष्णा कोयना उपसा सिंचनचे सदर मंडळ कार्यालय यवतमाळ येथे स्थानांतरीत करण्यात आले होते.  जिल्ह्यात अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. परंतु या प्रकल्पातील पाणी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. स्वतंत्र जलव्यवस्थापन मंडळ कार्यालय सुरू झाल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाण्याचा अधिकाधिक वापर होण्यास मदत होणार आहे. यावेळी बोलतांना पालकमंत्र्यांनी या कार्यालयामुळे जिल्ह्यातील प्रखल्पातील पाण्याचा महत्तम वापर होण्याच्यादृष्टीने फायदा होणार असल्याचे सांगितले. कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सिंचन व्यवस्थेतील अडचणी समजून घेतल्या. श्री.काटपल्लीवार यांनी रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले.

            सुरूवातीस पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कार्यालयाच्या नामफलकाचे अनावरण करून कार्यालयाचा शुभारंभ केला.

 

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती