एमबीबीएसच्‍या प्रवेशासाठी रेखाला बळीराजाची मदत
*प्रवेशासाठी १७ हजारांचा धनादेश सुपूर्द
*मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. ३ : उरात शिकण्‍याची  जिद्द असली की, वाटेत कितीही, कुठलीही समस्‍या आली तरी मार्ग सापडतो. याचे जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांच्‍या पाल्‍याच्‍या डोळ्यासमोर असलेले उदाहरण म्‍हणजे उमरखेड तालुक्‍यातील मोचचंडी येथील रेखा खचकड या शेतकऱ्याच्या मुलीचे. रेखा हिचा गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र ठरूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे प्रवेशास मुकावे लागणार अशी स्थिती निर्माण झाली होती. त्‍यामुळे बळीराजा चेतना अभियानाच्‍या लोकसहभाग निधीतून १६ हजार ८०० रूपयांच्‍या धनादेश महाविद्यालयाच्‍या नावाने देऊन तिच्या प्रवेशाचा मार्ग सुकर केला आहे. जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले यांनी अभियानाचे स्‍मृतिचिन्‍ह देऊन तिचे मनोधैर्य वाढविण्‍यात आले. 
मोरचंडी येथील रणजित खचकड या शेतकऱ्याने १९९५मध्‍ये टोकाची भूमिका घेतली. त्यावेळी रेखा आईच्या उदरातच होती. तेव्‍हापासून रेखा आणि तिची आई पंचफुला या दोघींचा एकमेकींचा आधार. घरी केवळ दीड एकर शेतात काम किंवा मोलमजूरी करून उदरनिर्वाह चालायचा. अशाही स्थितीत रेखाने शिक्षणाची आवड जोपासली. गावातील जिल्हा परिषद शाळेतील चंद्रकांत कोलपुसे या शिक्षकाने रेखाची जिद्द ओळखली. तिला शैक्ष्‍ाणिक सर्व मदत करून बारावीपर्यंत शिकविले. इतकेच नव्‍हेतर रेखाच्या सीईटीच्या अभ्यासाला मदत केली. रेखाचा गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाला, मात्र प्रवेशाचे शुल्क भरण्याची सोय नव्हती. 
याबाबतची माहिती जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना मिळताच तातडीने याची दखल घेत तिच्‍या प्रवेशासाठी बळीराजा चेतना अभियातून मदत करण्‍याचे करण्‍याचे आदेश दिले. रेखा आणि तिची आई पंचफुला यांनी जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्‍यासाठी सुरू करण्‍यात आलेल्‍या बळीराजा चेतना अभियानाच्‍या लोकसहभाग निधीतून मंगळवारी, दि. २ ऑगस्‍ट रोजी महाविद्यालयाच्‍या नावाने १६ हजार ८०० रूपयांचा धनादेश देऊन मदत करण्‍यात आली.  त्‍यामुळे शेतकरी कन्‍येचे एमबीबीएस होण्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण होणार आहे.
…..
जिद्द ठेवल्‍याने मार्ग मिळाला
शेतकरी पुत्रांनी प्रतिकुल परिस्थितील कधीही न डगमगता आपला मार्ग त्‍यातून काढावा. जिद्द ठेवल्यामुळेच मला मार्ग मिळाला. शेतकरी आणि शेतकरी पुत्रांच्‍या मदतीसाठी बळीराजा चेतना अभियान खऱ्या अर्थाने त्‍यांच्‍या मागे ठामपणे उभे आहे.
 -रेखा खचकड
…..
आजपर्यंत तिघींना मदत
बळीराजा चेतना अभियानाच्‍या माध्‍यमातून शेतकऱ्यांच्‍या पाल्‍यांसाठी सुरू करण्‍यात आलेल्‍या योजनेतून नेर येथील किरण आणि पुजा गायकवाड या दोन बहिनी आणि उमरखेड तालुक्‍यातील मोरचंडी येथील रेखा खचकड अशा तिघींना एमबीबीएस प्रवेशासाठी अभियानाच्‍या माध्‍यमातून मदत करण्‍यात आली आहे. तसेच जिल्‍ह्यात असे विद्यार्थी शासकीय महाविद्यालयातील प्रवेशापासून वंचित असल्यास त्‍यांनी संबंधित तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी  केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती