नर्सिंग होम, पॅथॅालॅाजी केंद्रांवर नियंत्रण आवश्यक
- सचिंद्र प्रताप सिंह
* जिल्हा
ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक
* परिषदेच्या सदस्यांनी लक्ष केंद्रीत
करावे
यवतमाळ, दि. 3 : खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व पॅथॅालॅाजी केंद्रांद्वारे रूग्णांकडून
अव्वाच्या सव्वा रक्कम आकारून त्यांच्या मजबूरीचा फायदा घेतला जात असल्याच्या बाबी
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत अनेक सदस्यांनी निदर्शनास आणून दिल्या. असे
व्यावसायीक व केंद्रांद्वारे कायद्याचे उल्लंघन करत रूग्णांना त्रास देत असल्यास या
केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस कार्यवाही करू, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप
सिंह यांनी सांगितले.
महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा
पुरवठा अधिकारी शालीग्राम भराडी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश्वर काळे, उपप्रादेशिक
परिवहन अधिकारी शाम झोळ, परिषदेचे अशासकीय सदस्य डॅा.नारायण मेहरे, ज्योती खोब्रागडे,
विजय तेलंगे, मनोहर देशमुख, नरेंद्र पालारपवार, अशोक उमरतकर, प्रा.केशव चेटुले, राजेंद्र
ठाकूर, हितेश शेठ, विपुल पोबारू, गणपत काळे, बळवंत ठाकरे आदी उपस्थित होते.
एकाच प्रकारच्या
चाचणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी रक्कम आकारली जाते. अनावश्यक चाचण्या केल्या
जातात. रूग्णालयातील बेड व इतर बाबींचे दर निश्चित नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून
आलेल्या रूग्णास अव्वाच्या सव्वा दराचा फटका बसतो. स्वस्त दरातील औषधी लिहून दिल्या
जात नाही, अशा अनेक बाबी यावेळी सदस्यांद्वारे मांडण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांकडेही
अशा प्रकारच्या तक्रारी दाखल झाल्या आहे. याबाबी निदर्शनास घेता नर्सींग होम व अन्य
केंद्रांवर नियंत्रण असणे आवश्यक असून त्यासाठी ठोक कार्यवाही करणार असल्याचे जिल्हाधिकारी
म्हणाले. डॅाक्टरांच्या कट प्रॅक्टीसचा मुद्दाही यावेळी चर्चीला गेला.
मानव विकासच्या बस वर्ग 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी
असल्यातरी बसमध्ये जागा उपलब्ध असल्यास त्यापुढील विद्यार्थ्यांनाही बसमध्ये नेण्याची
सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तसेच नादुरूस्त एलईडी बल्ब तातडीने बदलून देण्याची सोय
वीज कंपनीने करावी, असेही त्यांनी सांगितले. औषध विक्री दुकानांनी आपले परवाने दुकानात
दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. तसेच ठराविक औषधांचे दरही नमुद करावे. यासोबतच आवश्यक
औषधांसाठी रेफ्रीजरेटर असणे आवश्यक असल्याने अन्न व औषध प्रशासनाने याबाबत योग्य ती
कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
..तर वीज अभियंत्यांच्या
वेतनातून कपात
ग्राहकांना
वीज कनेक्शनसाठी लागणारी सर्व्हीस केबल वीज कंपनीच्यावतीने पुरविण्यात आली पाहिजे.
परंतु अनेक ठिकाणी ग्राहकांनाच अशी केबल पुरविण्यास सांगितली जाते. वीज कंपनीच्यावतीने
जिल्ह्यातील सर्व अभियंत्यांना सदर केबल विनामुल्य उपलब्ध करून देण्याच्या सुचना करण्यात
आल्या आहे. यापुढे ग्राहकांना यासाठी भुर्दंड पडल्यास सदर रक्कम वीज अभियंत्याच्या
वेतनातून कपात करा,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
उघड्यावरील मास विक्रीवर
कार्यवाही
उघड्यावरील
मास विक्रीचा मुद्दा अनेक सदस्यांनी बैठकीत उपस्थित केला. यवतमाळ शहरासह ठिकठिकाणी
सर्रास अशी विक्री सुरू आहे. यामुळे पावसाळ्याच्या या दिवसात आरोग्याचा प्रश्न निर्माण
होऊ शकतो. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे उघड्यावरील
मास विक्रीवर ठिकठिकाणी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
00000

Comments
Post a Comment