वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान
टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा
-पालकमंत्री संजय राठोड
*उपाय सुचविण्यासाठी समिती गठीत
यवतमाळ, दि. 8 : वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. याचा पुर्वीच हतबल असलेल्या शेतकऱ्यांना चांगला फटका बसतो. अशा प्रकारे वारंवार होणाऱ्या नुकसानीवर कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी वन विभागास दिले.
वन्य प्राण्यांमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे दरवर्षी दाखल होतात. अशा प्रसंगी शासनाच्या वतीने मदतीही दिली जाते. परंतु सदर मदत नुकसानीच्या तुलनेत तोकडी असते. काही शेतकऱ्यांची प्राण्यांपासून दरवर्षीच नुकसान होते. अशा नुकसानीमुळे बरेच शेतकरी हतबल झाले आहे. त्यामुळे यावर कायमस्वरूपी प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे यांना दिले.
राज्यात ठिकठिकाणी गडकिल्ले मोठ्या प्रमाणावर आहे. या किल्ल्यांच्या सभोवार संरक्षणासाठी खोल खंदक असल्याचे आढळते. असे खंदक खोदल्यास वन्य प्राण्यांना शेतशिवारात शिरता येणार नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी वनांना शेतजमिनी लागून आहेत, अशा ठिकाणी वन हद्दीत खोल खंदक खोदून वन्य प्राण्यांवर पायबंद घालता येईल काय, याबाबत सखोल अभ्यास करून सुचना करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. यासह अन्य प्रकारच्या उपाययोजना कशा प्रकारे राबविता येईल, यासाठी एक समिती नेमून ठोस उपाययोजना सुचविण्याचेही त्यांनी सांगितले. शक्यतो या समितीने आपला अहवाल 15 ऑगस्टपूर्वी सादर करावा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी पडीक तथा ओसाड जमिनी आढळून येतात. या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केल्यास जिल्ह्यातील वन क्षेत्र वाढविण्यासोबतच पर्यावरणाला चांगल्या प्रकारे हातभार लावल्या जाऊ शकते. त्यामुळे पडीक व ओसाड जमिनीवर वृक्षारोपण हाती घेण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे यांना केल्या.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती