बँकांनी
शेती सुधारणांसाठी सहकार्य करावे
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*नाबार्ड
तर्फे बॅंकासाठी कार्यशाळा
यवतमाळ, दि. 5 : बँकांनी शेती सुधारणा आणि संलग्न
व्यवसासासाठी योग्य कर्ज प्रस्तावांचा सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करावा, असे
आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. नाबार्डतर्फे शेती सुधारणा आणि
संलग्न व्यवसायाकरिता केंद्र शासनाच्या विविध योजनांबाबत बॅंकांच्या कार्यशाळेच्या
उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, शासनाच्या योजना
सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुद्रा आणि
स्टॅंड अप इंडिया यासारख्या योजनांद्वारे स्वतंत्र व्यवसाय उभारण्याची संधी उपलब्ध
झाली आहे. याचा नवउद्योजक आणि शेतकऱ्यांनी सदुपयोग करून आपला आर्थिक विकास साधावा.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती नाजूक असल्याने बँकांनी त्यांना शेतमालावरील
प्रक्रिया करणारे उद्योग उभे करण्यासाठी अर्थसहाय्य करावे.
नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक प्रविण मेश्राम यांनी ॲग्री-क्लिनिक,
ॲग्री बिझनेस सेंटर आणि सोलर पंपसेट योजनांचे सादरीकरण केले. याप्रसंगी ॲग्रणी बॅंक
प्रबंधक प्रशांत देशपांडे, विदर्भ कोकण ग्रामिण बॅंकेचे क्षेत्रिय प्रबंधक एन. एन.
डुमरे, जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे महाव्यवसस्थापक अरविंद देशपांडे, तसेच प्रमुख बॅंकाचे व्यवस्थापक उपस्थित होते.
जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे श्री. देशपांडे यांनी ग्रामिण भंडारण
योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या गोदामाची गरज आणि महत्त्व
विषद केले. तसेच बॅंकेने सोलर पंप सेटविषयी ठरविलेल्या धोरणाची माहिती दिली.
विदर्भ कोकण ग्रामिण बॅंकेचे श्री. डुमरे यांनी योजनाकडे केवळ अनुदानाच्या
दृष्टीकोनातून बघता कामा नये, चांगले प्रकल्प तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करावा,
असे सांगितले. अग्रणी बॅंकेचे प्रबंधक श्री. देशपांडे यांनी स्टॅड-अप इंडिया योजनेबाबत
सादरीकरण केले. अनुसूचित जाती, जनजाती आणि महिलांना आपले व्यवसाय उभारण्यासाठी 10 लाख
ते एक कोटी रुपयांपर्यत कर्ज मिळण्याची सुविधा या योजनेंतर्गत देण्यात आली आल्याचे
सांगितले.
यावेळी लोणी येथील प्रगतीशील शेतकरी जयंत नंदापुरे यांनी
त्यांच्या शेतातील सोलर पंप सेटच्या यशस्वी प्रयोगाविषयी अनुभव सांगितला. मध्यवर्ती
बॅंकेचे आर्थिक साक्षरता केंद्राचे समुपदेशक दिपक देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
00000

Comments
Post a Comment