ऑक्टोबरमध्ये समाधान शिबिराचे आयोजन
-राज्यमंत्री मदन येरावार
यवतमाळ, दि. 8 : सर्वसामान्य नागरीकांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच विविध योजनांचा थेट लाभ देण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबीर आयोजित करणार असल्याचे ऊर्जा, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी सांगितले. शिबिराच्या आयोजनाची रूपरेषा ठरविण्यासाठी बचत भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, सहायक जिल्हाधिकारी केळापूरचे उपविभागीय अधिकारी दिपककुमार मिना, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यात आमदार समीर कुणावार यांच्या पुढाकाराने मोठ्या प्रमाणात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 37 हजार नागरीकांना शिबिराचा लाभ झाला. त्याच धर्तीवर जिल्ह्यात सदर शिबिराचे आयोजन करण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ. कुणावार यांनी आपल्या मतदारसंघात आयोजित केलेल्या शिबिराचे अनुभव व कार्यपद्धती एका सादरीकरणाद्वारे समजावून सांगितली. .
समाधान शिबिरात एका दिवशी एका विशिष्ट ठिकाणी हजारो नागरीकांना विविध प्रकारच्या सुविधा सहजतेने उपलब्ध करून देता येऊ शकते. शासनाच्या योजना गावांमध्ये प्रत्येक घरी व व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यांना खऱ्या अर्थाने योजनांचा लाभ मिळावा, तसेच योजनांबाबत त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने समाधान शिबीर उपयोगी ठरणार आहे. शासनात काम करीत असताना अधिकाऱ्यांनी आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर केला पाहिजे, असेही श्री. येरावार यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात दि. 19 व 26 ऑक्टोबर रोजी दोन ठिकाणी शिबिरे घेतले जातील. सदर शिबिर मंडळ स्तरावर होणार आहे. याठिकाणी 25 ते 30 विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील. शिबिराच्या दिवसापर्यंत नागरीकांच्या प्राप्त अर्जावर कार्यवाही केली जाणार आहे. सामान्यांना देण्यात येणाऱ्या वैयक्तिक व सामुहिक स्वरूपाच्या सुविधा शिबिराच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असल्याचे श्री. येरावार म्हणाले.
यावेळी आ. कुणावार यांनी वर्धा जिल्ह्यातील शिबिराच्या आयोजनाबाबतची सविस्तर माहिती दिली. चार ठिकाणी शिबिरे घेण्यात आली. यात जवळजवळ 37 लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्यांचा त्रास वाचविण्यासाठी शिबिर अतिशय मोलाचे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी मार्गदर्शन केले.
 बैठकीला महसूल, कृषि यासह विविध विभागाचे अधिकारी तसेच कृषि सहायक, तलाठी, ग्रामसेवक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित