भ्रष्टाचारप्रकरणी दाखल तक्रारींवर त्वरीत कार्यवाही करा
 - सचिंद्र प्रताप सिंह
जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक
यवतमाळ, दि. 4 : पदाचा गैरवापर करत अनेक अधिकार, कर्मचारी गैरमार्गाचा अवलंब करीत असतात. अशा प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी तसेच सर्वसामान्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी जिल्हास्तरावर प्राप्त भ्रष्टाचारांच्या तक्रारींवर त्वरीत कार्यवाही केली जावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.
महसूल भवन येथे जिल्हा भ्रष्टाचार समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, बांधकामचे अधिक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दारव्हा तालुक्यातील पाळोदी येथील महिलेने केलेल्या तक्रारीवरून पाटबंधारे विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी लाभ क्षेत्राचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले आहे. तसेच निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या भूसंपादनात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे योग्य कार्यवाहीचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. यावेळी अंजनखेडा येथील जीवन प्राधिकरण योजनेच्या योजनेतील भ्रष्टाचार, गोधणी बोधगव्हाण येथील रस्त्याचे खोटे दानपत्र दाखवून भ्रष्टाचार, गोधणी येथील खदानीतून अवैध उत्खनन आदींबाबत प्राप्त तक्रारींवर बैठक चर्चा झाली. या सर्व तक्रारींवर योग्य कार्यवाही कालमर्यादेत करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले.
यवतमाळ वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोडीबाबत दाखल तक्रारीची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सक्त कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासोबतच बैठकीत विविध तक्रारींवर चर्चा करण्यात आली.
लाभाचे अनुदान देतांना दक्षता घ्या
महागाव तालुक्यातील टेंभी (काळी) येथे एका लाभार्थ्यांस शौचालयाचे अनुदान देण्यात आले आहे. परंतु सदर लाभार्थी पुर्वीच मयत झाला असल्याचे नंतर निदर्शनास आले. सुदैवाने या अनुदानाचा गैरवापर झाला नाही. अन्यथा अनेकांना कार्यवाहीस सामोरे जावे लागले असते. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी विविध प्रकारच्या लाभाचे धनादेश देतांना लाभार्थी हयात असल्याची खात्री संबंधितांनी केली पाहिजे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 
तपासणी नाक्यांवर लक्ष द्या
        पिंपळखूटी चेकपोष्टबाबत अनेक तक्रारी वारंवार प्राप्त होतात. अनेक प्रकारचे गैरप्रकार या नाक्यांवर होत असल्याचे दिसून येते. असे तपासणी नाके शासनाची बदनामी करणारे ठरत आहे. त्यामुळे या नाक्यांवर बारकाईने लक्ष द्या, अशा सुचना बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
जिल्ह्यातील धरणांचे सिक्युरीटी आडीट
            दरवर्षी पेक्षा यावर्षी पर्जन्यमान जास्त होणार आहे. त्यामुळे अनेक धरण यावर्षी पहिल्यांदाच भरण्याची शक्यता आहे. धरण शंभर टक्के भरल्यानंतर कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये यासाठी सर्व धरणांचे सुरक्षेच्यादृष्टीने सिक्सुरीटी आडीट करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभाभागास दिले.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती