जागतिक आपत्ती निवारण दिनानिमित्त यवतमाळ पब्लिक स्कूल येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा; जलसंधारणाचेही महत्त्व पटवून दिले

यवतमाळ, दि. १३: जागतिक आपत्ती निवारण दिनानिमित्त आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे, विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती सज्जता निर्माण करणे तसेच जलसंधारण व पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने यवतमाळ पब्लिक स्कूल येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस शासनाचे आपत्ती व्यवस्थापन मास्टर ट्रेनर श्री. हरिश्चंद्र राठोड यांची उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना पूर, भूकंप, आग, वीज पडणे यांसारख्या आपत्तींच्या वेळी घ्यावयाची काळजी, सुरक्षित स्थलांतर, प्रसंगावधान आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जलसंधारणाचे महत्त्व आणि पाण्याचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणे, जिरवणे आणि त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. पाण्याची वाढती मागणी, भूजल पातळीत होणारी घट आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी पाणी बचतीसाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. ग्रामीण भागात श्रमदानातून वनराई बंधारे बांधणे, शेततळी तयार करणे, नाल्यांमधील पाणी अडवून जमिनीत मुरविणे, तर शहरी भागात पावसाचे पाणी साठविणे, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अवलंब करणे आणि विहिरींचे पुनर्भरण करणे यांसारख्या उपाययोजनांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळणे, नळ उघडे न ठेवणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे यांसारख्या सवयी दैनंदिन जीवनात अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंधारण यांचा परस्पर संबंध स्पष्ट करताना, पूर व दुष्काळ यांसारख्या आपत्तींचे परिणाम कमी करण्यासाठी नियोजनबद्ध जलव्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे ज्ञान आत्मसात करण्यासोबतच जलसंधारणाचा संदेश आपल्या कुटुंबापर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवावा. “पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा आणि आपत्तींसाठी सज्ज राहा” हा संदेश या कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती सज्जता, पर्यावरण संवर्धन, पाणी बचत आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 000000

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित