खरीप हंगामात 'एल-निनो'च्या संकटावर मात करण्यासाठी अष्टसुत्री !

 शेतकऱ्यांनी ‘अष्टसुत्रीचा’ अवलंब करावा  जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन यावर्षी 'एल-निनो'च्या पार्श्वभूमीवर पावसाची अनिश्चितता लक्षात घेता, खरीप हंगाम सुरक्षित करण्यासाठी कृषी विभागाने काही 'लक्ष केंद्रित बाबी' निश्चित केल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामत 'एल-निनो'च्या संकटावर मात करण्यासाठी अष्टसुत्रीचा अवलंब करून आपले उत्पन्न सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले. त्यानुसार पेरणीचे प्रगत तंत्रज्ञान, बीबीएफ तंत्राचा वापर, पाणी व मृदा संधारण, मृदा आर्द्रता, पीक व बियाणे नियोजन, फळबागा संरक्षण, खते व सिंचन व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचन ही अष्टसूत्री निश्चित करण्यात आली आहे. या अष्टसुत्रीनुसार जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी उताराला आडवी पेरणी करावी. प्रत्येक गावात किमान ३० टक्के शेतकऱ्यांनी 'रुंद वरंबा सरी' (बीबीएफ) पद्धतीने पेरणी करावी. शेततळे तयार करुन पावसाचे पाणी साठवण्यावर भर द्यावा. मल्चिंग, सेंद्रिय खत आणि मूलस्थानी जलसंधारणाचा वापर करून जमिनीचा ओलावा टिकवा. बदलत्या वातावरणात तग धरतील अशा 'हवामान अनुकूल' बियाण्यांचीच निवड करा. जिल्ह्यातील एकूण फळबाग क्षेत्रापैकी किमान २०% क्षेत्राचे विशेष संरक्षण व जतन करावे. जमिनीच्या सुपीकता निर्देशांकावर आधारित खतांचा संतुलित वापर करावा आणि ५० टक्के प्रसार तंत्राचा वापर करून खतांचा खर्च कमी करा. ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर वाढवून पीक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी या अष्टसुत्रीचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती