'एकाग्रता आणि लक्ष्य गाठण्याची जिद्द' हीच यशाची गुरुकिल्ली - सहाय्यक जिल्हाधिकारी रेवैयाह डोंगरे (भाप्रसे)

'युवा संवाद' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाच्या मोहात न पडता स्पर्धा परीक्षेत यशासाठी अभ्यासातील एकाग्रता आणि लक्ष्य गाठण्याची जिद्द आवश्यक असल्याचे प्रतिपादन भारतीय प्रशासकीय सेवेतील सहायक जिल्हाधिकारी रेवैयाह डोंगरे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित 'युवा संवाद' कार्यक्रमात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, मुख्यमंत्री फेलो विठ्ठल गाडगे, प्रसाद कुलकर्णी, कुणाल पाटील आणि मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षार्थी उपस्थित होते. संघर्ष आणि यशाचा प्रेरणादायी प्रवास रेवैयाह डोंगरे यांनी अत्यंत साध्या आणि प्रामाणिकपणे आपला जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. तेलंगणाच्या 'सुपर ५०' आश्रम शाळा प्रकल्पातून आयआयटी मद्रासपर्यंतचा प्रवास त्यांनी उलगडला. आयआयटीमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना जिल्हा प्रशासनाने मदतीचा हात दिला, यातूनच प्रशासनाच्या संवेदनशीलतेची जाणीव झाली आणि नागरी सेवेची ओढ निर्माण झाली, असे त्यांनी सांगितले. 'आपदा में अवसर' आयआयटीमध्ये सुरुवातीला इंग्रजी माध्यमामुळे अडचणी आल्या आणि सीजीपीए ६.१ पर्यंत खाली आला. मात्र, सातत्य आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी यश खेचून आणले. रिलायन्ससारख्या नामांकित कंपनीतील मोठी नोकरी आणि ओएनजीसीमधील १२ तासांच्या कठीण शिफ्ट्सनंतरही केवळ 'आत्मिक समाधाना'साठी त्यांनी युपीएससीचा मार्ग निवडला. युपीएससीच्या तयारीदरम्यान झालेला अपघात आणि मिळालेल्या ३ महिन्यांच्या विश्रांतीचा उपयोग त्यांनी अभ्यासासाठी करून 'आपदा में अवसर' ही म्हण सार्थ ठरवली. स्पर्धा परीक्षेसाठी यशाची पंचसूत्री विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सहायक जिल्हाधिकारी रेवैयाह डोंगरे यांनी स्पर्धा परीक्षेसाठी यशाची पंचसूत्री सांगितली. यात अभ्यासाची सुरुवात 'एनसीईआरटी'च्या पुस्तकांपासून करा. दर्जेदार पुस्तके निवडा आणि मर्यादित संसाधन ठेवा, वारंवार उजळणी करा. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण करा. युट्यूबचा व्हिडीयोंचा वापर अभ्यासासाठी स्मार्ट पद्धतीने करा, असे. सांगून "खराब रणनीती सुद्धा एक रणनीतीच असते, कारण ती तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव करून देते," असेही ते म्हणाले. "योग्य मार्गदर्शन, शिस्त आणि रणनीती असेल तरच युपीएससी शक्य" - जिल्हाधिकारी विकास मीना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले की, कोचिंग नसले तरी योग्य मार्गदर्शन, शिस्त आणि रणनीती असल्यास युपीएससी परीक्षेत यश शक्य आहे. स्वतःच्या आयुष्यातील उदाहरणे देत त्यांनी सांगितले की, जेईई, गेट आणि युपीएससी या तिन्ही परीक्षा त्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय केवळ योग्य मार्गदर्शन आणि शिस्तीच्या जोरावर उत्तीर्ण केल्याचे सांगितले. तसेच स्वत: सारखी पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन व प्रेरणा घ्यावी. शेवटी, अपयश नव्हे, तर लहान ध्येय ठेवणे हा एकप्रकारे गुन्हाच ठरतो असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह भरला. जिल्हा प्रशासनाचा हा 'युवा संवाद' उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षार्थींसाठी एक उत्तम व्यासपीठ ठरत असून, या कार्यक्रमाला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती