जर्मनीमध्ये ‘शिका आणि कमवा’ची सुवर्णसंधी
युवकांसाठी अप्रेंटिसशिप कार्यक्रम
जर्मनीमध्ये ‘शिका आणि कमवा’ची सुवर्णसंधी जिल्ह्यातील युवकांसाठी ‘ऑसबिलडुंग’ कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या ‘महिमा’ महाराष्ट्र फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड अडवांसमेंट उपक्रमांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी ‘मॅजीक बिलीयन’ यांच्या संयुक्त सहकार्याने जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी जर्मनीमध्ये शिक्षणासह रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
‘शिका आणि कमवा’ या संकल्पनेवर आधारित ‘ऑसबिलडुंग’ (अप्रेंटिसशिप) कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना जर्मनीमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण घेत असतानाच प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि आकर्षक मानधन मिळणार आहे. या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्रातील कुशल व होतकरू युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण, रोजगार आणि दीर्घकालीन करिअरच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. जर्मनीमध्ये कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असून भारतीय युवकांसाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये
ऑसबिलडुंग कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना दोन पद्धतींनी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंगद्वारे प्रत्यक्ष उद्योगातील कामाचा अनुभव तसेच थेअरी क्लासद्वारे शैक्षणिक प्रशिक्षणाचा समावेश राहणार आहे. फूड प्रोसेसिंग (अन्न प्रक्रिया), लॉजिस्टिक्स व सप्लाय चेन, तांत्रिक ट्रेड्स (मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, एच. व्ही. ऐ. सी. प्लंबिंग) तसेच मेटल बिल्डर व मशीन ऑपरेटर आदी क्षेत्रांमध्ये प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे.प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा जर्मन चलनानुसार सुमारे १,०४८ युरो इतके स्टायपेंड मिळणार असून भारतीय चलनानुसार अंदाजे ९४ हजार ते ९५ हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांना शिकत असतानाच आर्थिक आधार मिळणार आहे.
पात्रता निकष
उमेदवारांचे वय १८ ते २८ वर्षे असावे. पुरुष व महिला दोघेही अर्ज करण्यास पात्र आहेत. किमान १२वी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आवश्यक असून काही तांत्रिक क्षेत्रांसाठी गणित विषय अनिवार्य आहे. आयटीआय किंवा डिप्लोमा धारकांना प्राधान्य दिले जाणार आहे. जर्मन भाषा बी-१ स्तर आवश्यक असून जर्मन भाषा प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणानंतर कायमस्वरूपी नोकरीची संधी
यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना जर्मनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळणार आहे. प्रारंभीचे मासिक वेतन सुमारे २२०० युरो इतके असून भारतीय चलनानुसार सुमारे २ लाखपेक्षा अधिक असणार आहे. तसेच भविष्यात जर्मनीमध्ये पर्मनंट रेसिडेन्सी पीआर मिळविण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.
इतर सुविधा उपलब्ध
विमान तिकीट, रिझ्युमे तयार करण्यासाठी मार्गदर्शन, मुलाखत प्रशिक्षण, व्हिसा प्रक्रियेस सहाय्य तसेच जर्मनीमध्ये पोहोचल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नोंदणी प्रक्रिया व शुल्क
नोंदणी करताना उमेदवारांना सुरुवातीला ४५ हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर उमेदवारांना कंडिशनल ऑफर लेटर प्रदान करण्यात येईल आणि भारतातून १२ महिने जर्मन भाषा शिकण्याची संधी दिली जाईल. जर्मनीकडून अंतिम ऑफर लेटर प्राप्त झाल्यानंतर उर्वरित शुल्क भरायचे असून त्यासाठी २.५ लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जर्मनीसारख्या प्रगत देशामध्ये शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार मिळविण्याची ही महत्त्वपूर्ण संधी असून जागतिक स्तरावर करिअर घडवू इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ प. भ. जाधव, सहायक आयुक्त यांनी केले आहे.
Comments
Post a Comment