पाणीटंचाई निवारण : आर्णी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी अरुणावतीचे पाणी!
जिल्हाधिकाऱ्यांचे पाणी सोडण्याचे आदेश
नागरिकांना दिलासा
आर्णी तालुक्यातील अरुणावती नदीकाठावरील तीन ग्रामपंचायतींमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या निवारणार्थ ग्रामस्थ व जनावरांकरिता पिण्याच्या पाण्याची उपलब्धतेसाठी अरुणावती प्रकल्पातून एक दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत.
गटविकास अधिकारी, पंचायत समिती आर्णी यांनी सन २०२५-२६ मधील उन्हाळी टंचाई कालावधीसाठी आरक्षित दोन दलघमी पाणीसाठ्यातून एक दलघमी पाणी सोडण्याची विनंती केली होती. या मागणीस मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी शिफारस केली होती.
सद्यस्थितीत अरुणावती प्रकल्पाच्या धरणात ७१.०९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, त्यापैकी एक दशलक्ष घनमीटर पाणी अरुणावती नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. हे पाणी संबंधित गावांतील नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या गरजांसाठी वापरण्यात येणार आहे. तसेच, पाणी पट्टी देयकाची रक्कम भरण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यावर राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
प्रकल्पातून पिण्याच्या पाणीकरिता विसर्ग होणार असून नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जनावरे किंवा स्वतः जाण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाचे वतीने करण्यात येत आहे
Comments
Post a Comment