जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक जनजागृती शिबिर
मूलभूत कर्तव्ये, वैकल्पिक वाद निवारण व बाल-स्नेही कायदेशीर सेवा योजनांवर मार्गदर्शन
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शेखर सी. मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व श्री वसंतराव नाईक शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ मे रोजी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
“नागरिकांचे मूलभूत कर्तव्य तसेच वैकल्पिक वाद निवारण पद्धती व त्यांचे फायदे, नालसा मुलांसाठी बाल-स्नेही कायदेशीर सेवा योजना २०२४, पोक्सो कायदा तसेच जागृती न्याय तळागाळातील माहिती आणि पारदर्शकता उपक्रम योजना २०२५” या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळचे सचिव दिपक एच. दाभाडे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री वसंतराव नाईक शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता अंजली एम. गहरवाल उपस्थित होत्या. कार्यक्रमात मुख्य लोकअभिरक्षक एस. टी. कुलकर्णी व पॅनल वकील सोनाली भोयर यांनी मार्गदर्शन केले.
एस. टी. कुलकर्णी यांनी भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांविषयी माहिती देताना संविधान, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करणे, देशाची एकता व अखंडता राखणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आदी ११ मूलभूत कर्तव्यांची माहिती दिली. तसेच पर्यायी विवाद निवारण पद्धतीद्वारे न्यायालयीन प्रक्रियेबाहेर तडजोडीने वाद सोडविण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
सोनाली भोयर यांनी नालसा जागृती योजना २०२५ अंतर्गत तळागाळातील नागरिकांपर्यंत कायदेशीर साक्षरता व न्याय पोहोचविण्याच्या उद्देशाबाबत माहिती दिली. तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ (पोक्सो कायदा) याविषयीही मार्गदर्शन केले.
दिपक एच. दाभाडे यांनी राज्यघटना ही समाजातील सर्व घटकांचा अभ्यास करून तयार करण्यात आल्याचे सांगितले. नागरिकांनी आपल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नालसा जागृती योजनेद्वारे ग्रामीण व दुर्गम भागात कायदेविषयक माहिती पोहोचविण्याचे काम होत असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदिता चनाख यांनी केले तर आभार प्रदर्शन रिया ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment