महाराजस्व समाधान शिबिरात लाभार्थ्यांना ३ लाख १६ हजार दाखले, प्रमाणपत्र वितरित

 ७ मार्च ते १५ मे दरम्यान शिबिरांचे आयोजन
  नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 
 ६६ हजार डिजिटल सातबारे वितरित 

 राज्य शासनाच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातील १०९ मंडळांमध्ये ७ मार्च ते १५ मे या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत आयोजित शिबिरांना सर्वच मंडळात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या समाधान शिबिराअंर्तगत आतापर्यंत विविध प्रकारचे ३ लाख १६ हजार ७१८ दाखले व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपजिल्हाधिकारी पुनम अहिरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम व पत्रकार बांधव उपस्थित होते. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील शिबिरामध्ये आरोग्य, शिक्षण, पोलीस, पशुसंवर्धन, कृषी आदी २२ विभाग एकाच छताखाली आणून लाभार्थ्यांना योजनेची माहिती व लाभ देण्यात आला. तसेच आतापर्यंत झालेल्या सर्वच शिबिरामध्ये महसूल विभागाच्या विविध सेवा देण्यात आल्या. त्यामध्ये ११०५६ फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आले, ४६६८ सातबारमधील दुरुस्ती अर्ज स्विकारण्यात आले, ६६,७७५ डिजिटल सातबारा, ४९,०६६ नमुना ८ अ उतारे उपलब्ध करुन देण्यात आले. १,४०,२२७ प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत ३०,५५८ अर्ज निकाली काढण्यात आले. १,२८९ भूसंपादन व अकृषक परवानगीच्या ११७ प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करुन गाव दफ्तर अद्ययावत करण्यात आले. जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत अद्यावत १२,१८५अभिलेख उपलब्ध करुन देण्यात आले. ३२८ प्रकरणांमध्ये भोगवटादार वर्ग २ जमीन वर्ग १ करण्याबाबतची कार्यवाही करण्यात आली. तुकडेबंदीनुसार २८ सातबाराचे वाटप, १४ पाणंद रस्त्यांना प्रशासकीय मान्यतेचे आदेश देण्यात आले. तसेच सर्वांसाठी घरे योजनेतून ४०४ लाभार्थ्यांना पट्ट्यांची वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी दिली. या अभियान कालावधीमध्ये महसूल मंडळांमध्ये समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. या दरम्यान सर्वच मंडळात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरामध्ये आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, पशुसंवर्धन, कृषी विभाग आदी २२ विभागांनी लाभार्थ्यांना योजनेची माहिती व लाभ देण्यात आले. या शिबिरांविषयी नागरिकांपर्यंत प्रभात फेरी, दवंडी, व्हॉट्सॲप, समाज माध्यम, पथनाट्य, व विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, नायब तहसीलदार यांच्या सभा घेऊन नागरिकांना शिबिराबाबत माहिती देण्यात आली. यासह व्याख्यान, आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांना जिल्हाधिकारी व भारस्थ अधिकारी यांनी अचानक भेटी देवून पाहणी केली व आवश्यक सूचना केल्या.
या अभियानाच्या प्रत्येक टप्प्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन मंडळ अधिकाऱ्यांचा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करुन गुणगौरवही करण्यात आला, असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी दिली.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान