IPL नव्हे आता शेतकऱ्यांचा FGL शेतकरी गटांसाठी ‘फार्मर ग्रुप लीग' स्पर्धा

 10 जूनपासून स्पर्धेला सुरुवात  15 ऑगस्ट रोजी विजेत्यांचा गौरव जिल्हा प्रशासन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकरी गटांसाठी जिल्ह्यात आगळीवेगळी ‘फार्मर ग्रुप लीग' स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकरी गटांच्या सदस्यांना करावयाच्या कामांचे चार स्तर निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक स्तरामध्ये चार ते पाच लघु कृती अथवा अ‍ॅक्टिव्हिटी देण्यात येणार असून त्या यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना गुणांकन दिले जाईल. स्पर्धेदरम्यान करण्यात आलेल्या सर्व कृतींचे व्हिडिओ चित्रण, छायाचित्रे तसेच नोंदवही ठेवणे सहभागी सदस्यांसाठी आवश्यक राहणार आहे. चारही स्तर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांचा 15 ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांना आंतरराज्य, राज्य व जिल्हास्तरीय अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे. विजयाचे चार स्तर या फार्मर ग्रुप लिग स्पर्धेत चार टप्पे किंवा स्तरानुसार गुणांकन केले जाणार आहे. त्यामध्ये मृदा व बीज व्यवस्थापन, पीक पद्धती व शेती तंत्रज्ञान, जैविक निविष्ठा व कीड रोग व्यवस्थापन, क्षमता बांधणी, प्रसार व तंत्रज्ञान वापर या चार टप्प्यानुसार गुणांकन दिले केले जाणार आहे. टप्पेनिहाय गुणांकन त्यानुसार पहिल्या टप्प्यात मृदा व बीज व्यवस्थापन अंतर्गत माती नमुने तपासणी, बियाणे उगवण चाचणी, बीज प्रक्रिया, शेणखत, गांडूळखत, हिरवळीचे खतासाठी (प्रती शेतकरी) प्रत्येकी एक गुण मिळणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात पीक पद्धती व शेती तंत्रज्ञान अंतर्गत बीबीएफ व टोकन यंत्र वापर, सापळा पिके, आंतरपीकांसाठी (प्रति एकर) प्रत्येकी एक गुण दिले जातील. तिसऱ्या टप्प्यातील भाग एक मध्ये जैविक निविष्ठा निर्मिती अंतर्गत वनस्पतीजन्य कीटकनाशके, जीवामृत, घनजीवामृत निर्मितीसाठीएक गुण तर बायोडायनॅमिक कंपोस्ट निर्मिती करणाऱ्यांना दोन गुण दिले जातील. तसेच भाग दोनमध्ये प्रत्यक्ष कीड रोग नियंत्रण अंतर्गत हुमा अळी नियंत्रण मोहीम, ट्रायकोकार्ड व फेरोमन ट्रॅप्स, चिकट सापळे, पक्षी थांबे या घटकासाठी प्रत्येकी एक गुण मिळणार आहे. चौथा टप्पा हा महत्त्वाचा असून त्यामध्ये प्रसार क्षमता बांधणी व नेतृत्व अंतर्गत शेतीशाळा सहभागासाठी एक गुण, जलतारा शेत शोषखड्डा निर्मितीसाठी दोन गुण तर शिवार फेरी, कार्यशाळा, गावाबाहेर मार्गदर्शन करणाऱ्यांना प्रती कार्यक्रमाचे ५ गुण मिळणार आहे. १० गुणांचा मेगा बोनस या फार्मर ग्रुप लिग स्पर्धेतील चौथ्या टप्प्यात महाविस्तार ॲपचा वापर करणाऱ्या तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान व यशोगाथांचा प्रसार करणाऱ्या शेतकरी गटांना १० गुणांचा मेगा बोनस मिळणार आहे. नोंदणी कशी करायची ? या स्पर्धेसाठी नोंदणी 26 मे पासून ते 10 जूनपर्यंत गुगल फॉर्मद्वारे आणि गावाचे सहायक कृषी अधिकारी यांच्याकडे करता येणार आहे. शेतकरी गटांना https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScl6D6zS6otJRv2niDek7Svb-tSSWU722iwqku237Vz2lhJBg/viewform?usp=header या गुगल फॉर्ममधील माहिती भरून नोंदणी करता येणार आहे. सहभागाचे निकष या स्पर्धेतील निकषानुसार प्रत्येक गावातून किमान एक शेतकरी गट अनिवार्य आहे. एका गटामध्ये किमान १० ते २० सदस्य असावेत. कोट जिल्ह्यातील शेतकरी हा प्रगतिशील असून, शेतीत नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती पद्धतीत सुधारणा करत आहे. जिल्ह्यात प्रथमच यवतमाळ फार्मर ग्रुप लीग राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शेतकरी गट म्हणून आधुनिक तंत्रज्ञान, पिकांचे योग्य व कमीत कमी खर्चात व्यवस्थापन आणि समूह शेती यासाठी स्पर्धा घेऊन, अशा शेतकऱ्यांचा व गटांचा योग्य सन्मान करण्यात येईल. जास्तीत जास्त शेतकरी गटांनी या स्परधेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती