चिंचोली येथे माती परीक्षणातून समृद्ध शेतीकडे वाटचाल
भोजाजी महाराज शेतकरी गटाचा शास्त्रयुक्त व कमी खर्चाच्या शेतीचा संकल्प
चिंचोली येथील शेतकऱ्यांनी माती परीक्षण, सेंद्रिय उपाययोजना आणि गटशेतीच्या माध्यमातून समृद्ध शेतीकडे वाटचाल सुरू केली आहे. अमोल ठाकरे व इतर शेतकरी पाणी फाउंडेशन अंतर्गत आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप 2026 च्या तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी वरोरा येथे सहभागी झाले होते. प्रशिक्षणानंतर त्यांनी गावातील शेतकऱ्यांशी चर्चा करून भोजाजी महाराज शेतकरी गटाची स्थापना केली.
“एक काठी सहज मोडता येते; पण शंभर काठ्या एकत्र आल्या तर मोडता येत नाहीत,” या उक्तीप्रमाणे गटशेतीतून शेतकऱ्यांची ताकद अनेक पटींनी वाढते, ही भावना गटातील सदस्यांनी व्यक्त केली. कृषी विभाग महाराष्ट्र शासन, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रयुक्त व कमी खर्चातील शेती करून अधिक उत्पादन घेण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे.
गटातील सदस्यांनी शेतातील मातीचे नमुने शास्त्रीय पद्धतीने काढून प्रयोगशाळेत पाठवले आहेत. माती परीक्षण अहवालाच्या आधारेच सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पेरणी करताना उताराला आडवी पेरणी व सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरविण्यात आले आहे.
शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, कीटकनाशके व इतर निविष्ठा गटामार्फत संयुक्तपणे खरेदी करण्यात येणार असल्याने खर्चात मोठी बचत होणार आहे. याशिवाय गांडूळ खत, दशपर्णी अर्क व लिंबोळी अर्क घरच्या घरी तयार करून कमी खर्चात प्रभावी कीड नियंत्रण साधले जाणार आहे. मित्र कीटकांचे संवर्धन, पिवळे चिकट सापळे, पक्षी थांबे, सापळा पीक पद्धती, लिंगआकर्षक सापळे आणि लाईट सापळ्यांचा वापर करून एकात्मिक शेती पद्धती राबविण्याचा निर्धार गटातील सदस्यांनी व्यक्त केला.
यावेळी कृषी विभागाचे राहुल मनवर, उमेद अभियानचे राजेंद्र कुरपुडे तसेच पाणी फाउंडेशन चे शुभम पंचभाई व रिला ठक्कर उपस्थित होते. गटातील सदस्यांसह गावातील बहुसंख्य शेतकरी या उपक्रमात सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment