वेडशी येथे दशपर्णी अर्क बनविण्याचा सोहळा उत्साहात

कृषी विभाग, उमेद आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या फार्मर कप उपक्रमांतर्गत राज्यभर दशपर्णी अर्क बनविण्याचे उपक्रम राबविले जात आहेत. याचाच भाग म्हणून राळेगाव तालुक्यातील वेडशी येथे तेजस्वी शेतकरी गटाच्या वतीने दशपर्णी अर्क बनविण्याचा सोहळा उत्साहात पार पडला. रासायनिक शेतीच्या वाढत्या दुष्परिणामांमुळे जमीन नापीक होत असून वायू, मृदा व जलप्रदूषणातही मोठी वाढ होत आहे. फळे, भाजीपाला, धान्य व डाळींमध्ये विषारी अंश आढळून येत असल्याने कर्करोग, हृदयरोग, शुगर, दमा, लकवा यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याची या पार्श्वभूमीवर गावोगावी शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहेत. तेजस्वी शेतकरी गटाच्या निमंत्रक सीमा चंद्रमणी पाटील व सदस्यांनी पाणी फाउंडेशनच्या निवासी प्रशिक्षणामध्ये दशपर्णी अर्काचे महत्त्व जाणून घेतले. कमी खर्चात घरच्या घरी प्रभावी कीड नियंत्रण करता येत असल्याने तसेच रासायनिक फवारणीवरील खर्चात मोठी बचत होत असल्याने सदस्यांनी सेंद्रिय व विषमुक्त शेतीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार केला. गटातील सदस्यांनी गोमूत्र, शेण, लसणाचा ठेचा, मिरचीचा ठेचा तसेच जनावरे न खाणाऱ्या परिसरातील दहा प्रकारच्या वनस्पतींचा पाला गोळा करून त्यापासून मिश्रण तयार केले. हे मिश्रण दोनशे लिटरच्या टाकीत पाण्यासह मिसळून तयार करण्यात आले. पुढील ३० ते ३५ दिवस हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा लाकडी काठीने ढवळण्यात येणार असून त्यानंतर दर्जेदार दशपर्णी अर्क तयार होणार आहे. हंगामभर या अर्काचा फवारणीसाठी वापर करण्याचा निर्णय गटातील सदस्यांनी घेतला आहे. यावेळी कृषी विभागाचे राहुल मनवर, उमेदचे राजेंद्र कुरपूढे तसेच पाणी फाउंडेशन चे शुभम पंचभाई व रिटा ठवकर यांनी मार्गदर्शन केले. गटातील सदस्यांनी उत्स्फूर्तपणे दशपर्णी अर्क बनविण्यासाठी सहभाग नोंदवला.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती