संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र सादर करावे
-तहसिलदार डॉ. योगेश देशमुख यांचे आवाहन
> सत्यापन अॅपवर मिळतो प्रमाणपत्र
यवतमाळ शहरातील सर्व संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, नगर परिषद क्षेत्र, यवतमाळ अंतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना स्वतः (मोबाईल उपलब्ध असल्यास) अथवा इतर कोणत्याही नातेवाईकांमार्फत तसेच सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्रामार्फत बेनीफीसीअरी सत्यापन अॅप’द्वारे हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन तहसिलदार डॉ. योगेश देशमुख व नायब तहसिलदार राजेश चिंचोरे यांनी केले आहे.
लाभार्थ्यांनी स्वतः करावयाची कार्यपद्धती
सर्वप्रथम लाभार्थ्यांनी वापरकर्त्यांनी मोबाईलद्वारे गुगल प्ले स्टोअर आयओएस वरून ‘बीएसए (बेनीफीसीअरी सत्यापन अॅप)’ तसेच ‘आधार फेस आरडी’ हे अॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर बेनीफीसीअरी सत्यापन अॅप मध्ये लाभार्थ्यांनी किंवा वापरकर्त्यांनी भाषा निवडून “प्रोसीड फॉर डिव्हाईस रजिस्ट्रेशन” येथे क्लिक करून आधार क्रमांक व मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी.
लाभार्थ्यांनी वापरकर्त्यांनी नोंदणी पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष लाभार्थ्यांचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी. लाभार्थी ज्या योजनेचा लाभ घेत आहे त्या केंद्र, राज्य पुरस्कृत योजनेची निवड करून बेनीफीसीअरी व्हेरीफीकेशन हा पर्याय निवडावा. आधार क्रमांक व उपलब्ध मोबाईल क्रमांक नमूद करून सबमिट बटणावर क्लिक करावे. त्यानंतर ओटीपी सादर करून चेहरा ओळख अथवा बोटांच्या ठशांद्वारे डोळ्यांच्या पडद्याद्वारे पडताळणीचा पर्याय निवडावा. निवडलेल्या पर्यायाच्या आधारे हयात प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी बोटांचे ठसे अथवा चेहरा पडताळणी करावी. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हयात प्रमाणपत्र डाऊनलोड करून जतन करावे. सर्व लाभार्थ्यांनी वेळेत हयात प्रमाणपत्र सादर करून योजनेचा लाभ अखंडित सुरू ठेवावा, असे आवाहन तहसिलदार डॉ. योगेश देशमुख यांनी केले आहे.
Comments
Post a Comment