२२ मेपर्यंत उष्णतेची लाट : नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी !
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना जारी
भारतीय हवामानशास्त्र विभागाने यवतमाळ जिल्ह्यात २२ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविला असून वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिक, कामगार तसेच विविध शासकीय विभागांनी आवश्यक ती खबरदारी घेवून आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. भरपूर पाणी, ओआरएस, लिंबूपाणी व फळांचे सेवन करावे. हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत तसेच डोक्यावर टोपी, गमछा किंवा छत्रीचा वापर करावा. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. बंद वाहनात मुले किंवा प्राणी ठेवू नयेत, असेही सूचित करण्यात आले आहे.
बांधकाम, शेती, रस्ते कामे व औद्योगिक क्षेत्रातील कामगारांनी थेट उन्हात सलग काम टाळावे. सकाळी लवकर किंवा सायंकाळी कामाचे नियोजन करावे. प्रत्येक ३० ते ४५ मिनिटांनी पाणी पिणे आवश्यक असून कामाच्या ठिकाणी सावली, पिण्याचे पाणी व विश्रांतीची व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हेल्मेट, कॅप, हातमोजे व सुरक्षात्मक कपड्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ओआरएस, औषधे व आपत्कालीन उपचार सुविधा उपलब्ध ठेवाव्यात. ग्रामपंचायत व नगर परिषदांनी सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. शिक्षण विभागाने शाळांच्या वेळांमध्ये आवश्यक बदल करून विद्यार्थ्यांना उष्णतेपासून बचावाच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
उष्माघाताची लक्षणे दिसल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने थंड व सावलीच्या ठिकाणी हलवून थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. ओआरएस किंवा पाणी द्यावे व गंभीर स्थितीत तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी रुग्णवाहिका सेवेसाठी १०८, पोलीस मदतीसाठी १००, अग्निशमन दल १०१ तसेच आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन १०७७ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Comments
Post a Comment