तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रियेला सुरुवात ; यवतमाळ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथे सुविधा केंद्र सुरू

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६ - २७ मधील तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली असून, विद्यार्थ्यांना २० मे ते २२ जून या दरम्यान ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने या प्रवेश प्रक्रियेबाबतचे वेळापत्रक, शैक्षणिक अर्हता आणि प्रवेश अर्ज शुल्क इत्यादी बाबींची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. या प्रक्रियेत दहावीनंतर पहिल्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल, तसेच बारावी किंवा आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेण्यासाठी वेगळा अर्ज सादर करावा लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना योग्य ती मदत व्हावी म्हणून शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथे सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये जाऊन विद्यार्थी प्रत्यक्ष अर्ज भरू शकतात, तसेच त्यांच्या विविध समस्यांचे आणि शंकांचे निराकरण करण्यासाठी या केंद्रामधून मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रमाणपत्र व कागदपत्र पडताळणीसाठी प्रत्यक्ष पडताळणी आणि ऑनलाईन पडताळणी असे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर हा अर्ज संबंधित सुविधा केंद्राकडे पाठविला जाईल, आणि ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यावरच अर्ज निश्चित केला जाईल. जाहीर झालेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार २४ जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, तर अंतिम गुणवत्ता यादी २ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी विविध प्रवर्गानुसार जात किंवा जमात प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठीचे (इडब्य्लूएस) प्रमाणपत्र, दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र, सैन्य दलातील प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र, अल्पसंख्याक प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र आणि शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला (टी.सी.) ही आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. तरी या प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रप्रमुख यू. एम. शिरभाते यांच्याशी संपर्क साधावा, तसेच तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळचे प्राचार्य ए. पी. मटाले यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती