खरीप हंगाम : जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध
जिल्हाधिकारी विकास मीना यांची माहिती
खरीप हंगाम २०२६ साठी यवतमाळ जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून जिल्ह्यात विविध खतांचा एकूण १ लाख ३९ हजार ९२४ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला होता. त्यापैकी ३१ हजार ४८९ मेट्रिक टन खताची विक्री झाली असून विक्रेत्यांकडे अद्याप १ लाख ८ हजार ४३५ मेट्रिक टन शिल्लक साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, युरिया खताचा २८ हजार ७४१ मेट्रिक टन साठा उपलब्ध होता. त्यापैकी ९ हजार ६३१ मेट्रिक टन विक्री झाली असून १९ हजार ११० मेट्रिक टन साठा विक्रेत्यांकडे शिल्लक आहे. डीएपी खताचा ९ हजार ७८८ मेट्रिक टन साठा उपलब्ध असून त्यातील २ हजार २९६ मेट्रिक टन विक्री झाली आहे. विक्रेत्यांकडे ७ हजार ४९२ मेट्रिक टन डीएपी खत उपलब्ध आहे.
एमओपी खताचा २ हजार ५८४ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला असून त्यापैकी ५२७ मेट्रिक टन विक्री झाली आहे. संयुक्त खतांचा सर्वाधिक ६९ हजार १५५ मेट्रिक टन इतका साठा उपलब्ध झाला होता. त्यातील १४ हजार ७७६ मेट्रिक टन खताची विक्री झाली असून ५५ हजार १८० मेट्रिक टन साठा विक्रेत्यांकडे शिल्लक आहे.
तसेच एसएसपी खताचा २८ हजार ८५६ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला होता. त्यातील ४ हजार २५९ मेट्रिक टन विक्री झाली असून २४ हजार ५९७ मेट्रिक टन साठा विक्रेत्यांकडे शिल्लक आहे.
शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खत खरेदी करावे तसेच आवश्यकता लक्षात घेऊन संतुलित खताचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी केले.
रासायनिक खतांची तालुकानिहाय, वितरकनिहाय उपलब्धता पाहण्यासाठी जिल्हा स्तरावर https://agricultureyavatmal.blogspot.com/2025/06/box-sizing-border-box-margin-0-padding.html ब्लॉगस्पॉट तयार करण्यात आला असून, संनियंत्रण करण्यासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती करणेत आली आहे. शेतकऱ्यांनी याचा वापर करून, खत खरेदी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Comments
Post a Comment