जिल्ह्यात जनगणनेला प्रारंभ !
प्रत्यक्ष घरगणना सुरु
प्रगणकांना सहकार्य करा
-जिल्हा प्रशासनाचे आवाहन
आगामी जनगणना २०२७ ही देशातील सर्वात व्यापक व महत्त्वपूर्ण प्रशासनिक प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून जिल्ह्यात जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना कार्यास दि. १६ मे पासून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.
या टप्प्यामध्ये प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आलेले प्रगणक व पर्यवेक्षक कर्मचारी दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरभेटी देऊन माहिती संकलित करीत आहेत. घरगणनेदरम्यान प्रगणक घरांवर मार्कर किंवा खडूने क्रमांक चिन्हांकित करीत आहेत.
जनगणनेच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची कागदपत्रे, बँक खाते तपशील किंवा ओटीपी मागितला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शासनाने निश्चित केलेल्या ३३ प्रश्नांचीच विचारणा करण्यात येणार आहे.
जनगणना कार्य हे जनगणना अधिनियम, १९४८ अंतर्गत केले जात असून प्रगणक व पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांना घरांमध्ये प्रवेश करून माहिती घेण्याचा तसेच घरांना क्रमांक देण्याचा अधिकार आहे. जनगणनेत नोंदविण्यात येणारी माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
जनगणना कर्तव्याचे पालन न करणे अथवा निष्काळजीपणा केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जनगणनेकरीता येणाऱ्या प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
२२ हजार कुटुंबांनी केली स्वगणना
प्रत्यक्ष जनगणनेच्या सुरुवातीला १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना ऑनलाइन स्वगणना करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील २२ हजार ३१८ कुटुंबांनी स्वगणना केली.
५६०० अधिकारी, कर्मचारी ‘ऑन फिल्ड’
यवतमाळ जिल्ह्याच्या जनगणनेकरिता जिल्हाधिकारी प्रधान जनगणना अधिकारी असून निवासी उपजिल्हाधिकारी यांना जिल्हा जनगणना अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या जनगणनेकरिता साधारणत: ५ हजार ६०० अधिकारी व कर्मऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये ४६३८ प्रगणक, ७७९ पर्यवेक्षक, २ जिल्हास्तरीय तर ९२ क्षेत्रीय प्रशिक्षकांचा समावेश आहे.
२१२६ गावे तर २५५ वार्डमध्ये जनगणना
जिल्ह्यात प्रत्यक्ष जनगणनेला सुरुवात झाली असून यामध्ये ७००- ८०० लोकसंख्येच्या प्रमाणात एक गट याप्रमाणे ग्रामीण व शहरी असे एकूण ५०१३ गट तयार झालेले आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील २१२६ गावे आणि शहरी भागातील २५५ वार्डांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Comments
Post a Comment