२६ मे रोजी यवतमाळ येथे भव्य रोजगार मेळावा विविध नामांकित कंपन्यांमध्ये ५३० हून अधिक पदांसाठी भरती
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्याधारित मनुष्यबळ निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटरच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा २६ मे रोजी बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धामणगाव रोड, यवतमाळ येथे आयोजित करण्यात येणार आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक पात्रता पुरेशी नसून कौशल्याधारित प्रशिक्षण व उद्योगसंगत क्षमता विकसित करणे आवश्यक बनले आहे. रोजगार मेळावे हे उमेदवार व नियोक्ता यांच्यात थेट संवाद साधण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरत असून, या माध्यमातून उमेदवारांना तत्काळ मुलाखतीद्वारे नोकरीची संधी मिळते. तसेच उद्योगांना आवश्यक कौशल्ययुक्त मनुष्यबळ उपलब्ध होत असल्याने स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळते.
या रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांमार्फत एकूण ५३० पेक्षा अधिक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. सहयोग मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ट्रेनी क्रेडीट ऑफिसर पदासाठी २५ जागा उपलब्ध असून १२ वी उत्तीर्ण उमेदवार पात्र राहतील. वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे आहे.कोश कार्य प्रा. ली. कंपनीमध्ये ट्रेनी ऑपरेटर पदासाठी ४२० पदांची भरती होणार आहे. ऑटोमोबाईल व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील या पदांसाठी १२ वी उत्तीर्ण उमेदवार पात्र असून वयोमर्यादा १८ ते २३ वर्षे आहे.रेमंड युको डेनिम प्रा. ली., यवतमाळ येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी पदासाठी ५० जागा उपलब्ध आहेत. टेक्सटाईल व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील या पदांसाठी पदवीधर, डिप्लोमा किंवा आयटीआय सर्व ट्रेड उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे आहे. सारा स्प्रिंटेक्स प्रा. ली. येथे इलेक्ट्रिशियन, प्रोडक्शन ट्रेनी, फिटर आणि ग्रॅज्युएट ट्रेनी अशा विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. इलेक्ट्रिशियन पदासाठी आयटीआय इलेक्ट्रिशियन, फिटरसाठी आयटीआय सर्व ट्रेड, प्रोडक्शन ट्रेनीसाठी १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण तर ग्रॅज्युएट ट्रेनीसाठी पदवीधर उमेदवार पात्र राहतील. या सर्व पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३२ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
मँक व्हेईकल प्रा. ली., यवतमाळ येथे कम्प्युटर ऑपरेटर पदासाठी ३ जागा उपलब्ध असून पदवीधर व संगणकाचे ज्ञान असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या पदासाठी वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे आहे.इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहताना शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रती, आधारकार्ड झेरॉक्स, पासपोर्ट साईझ फोटो, रिझ्युम तसेच इतर आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, या रोजगार मेळाव्याद्वारे युवकांना थेट मुलाखतीतून रोजगार मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होत असून जास्तीत जास्त युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त प. भ. जाधव, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांनी केले आहे.
Comments
Post a Comment