विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्हास्तरिय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
आदर्श आचारसंहिता, कायदा-सुव्यवस्था
प्रशिक्षण व माध्यम व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी निश्चित
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास मीना यांनी जिल्हास्तरिय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रियेतील विविध समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी तसेच निवडणूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणी व कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मनुष्यबळ व्यवस्थापन, संगणकीकरण व मतदान,मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या नोडल अधिकारी म्हणून तहसीलदार राहुल मोरे, तर प्रशिक्षण व्यवस्थापनासाठी उपजिल्हाधिकारी अजितकुमार येळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक निरीक्षकांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. ए. शिरभाते यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रसारमाध्यमे व वृत्त वार्तांकनासाठी जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय कायदेशीर बाबींसाठी विधी अधिकारी मोहन गाडगे, मतदारयादी व्यवस्थापनासाठी सहाय्यक आयुक्त येमाजी धुमाळ, तर साहित्य खरेदी व निवडणूक साहित्य व्यवस्थापनासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश शिंगटे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वाहन व्यवस्थापनासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशात देशमुख, संगणक, सुरक्षा व आयटी अॅप्लिकेशनसाठी सहायक जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अक्षय चावरे यांची तसेच भोजन व अल्पोपहार व्यवस्थापनासाठीही जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जारी केले आहे.
Comments
Post a Comment