दसरा उत्साहात साजरा करा, पण पाणी जपून वापरा!
> जिल्हाधिकारी विकास मीना यांचे नागरिकांना आवाहन;
> वाहने धुतांना पाण्याचा अपव्यय टाळा
> दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे
यवतमाळ, दि. 15 (जिमाका) : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दसरा सण उत्साहात साजरा करताना नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, तसेच दैनंदिन जीवनात पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
सणासुदीच्या काळात आनंदोत्सव साजरा करताना पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. विशेषतः वाहने धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर टाळावा. घरगुती वापरातही पाणी वाया जाणार नाही, याची प्रत्येक नागरिकाने दक्षता घ्यावी. पाण्याची बचत ही प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून पाणी बचतीच्या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
पाण्याचा गैरवापर आढळल्यास माहिती द्या
पाण्याचा अनावश्यक वापर किंवा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्याबाबत प्रशासनाच्या 07232240720 किंवा 07232254305 या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार अथवा माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दसरा सण आनंदात साजरा करताना पाण्याची बचत करून सामाजिक जबाबदारी जाेपासावी. “पाणी वाचवा, पाणी जपून वापरा आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा,” असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
Comments
Post a Comment