रब्बी हंगामात करडई पिकाची पेरणी करा
> कृषी विभागाचे आवाहन
> कमी खर्चात अधिक नफा देणार करडई पीक
> सुधारित तंत्रज्ञान व व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन
यवतमाळ, दि. 15 (जिमाका) : जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने रब्बी हंगामात कमी पाण्यात व कमी खर्चात भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी करडई पिकाच्या सुधारित वाणांची निवड करून वेळेवर पेरणी व योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ यांनी केले आहे.
रब्बी हंगामातील करडई हे अतिशय महत्त्वाचे, अल्प खर्चाचे आणि अवर्षणावर मात करण्याची क्षमता असलेले महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. कोरडवाहू क्षेत्राकरिता हे पीक एक वरदान मानले जाते. ओलिताची सोय असल्यास या पिकापासून दुप्पट उत्पादन मिळवता येते. कृषी विभागातर्फे शेतकरी बांधवांसाठी करडई पिकाच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या सुधारित तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले जात आहे.
हवामान आणि जमीन
करडई या पिकाला थंड हवामान मानवते. मात्र, अति उष्णता किंवा अति थंडी आणि जास्त पाऊस/पाणी साचणे या पिकासाठी हानिकारक ठरते. तसेच मध्यम ते खोल, ओलावा टिकवून ठेवणारी आणि चांगला निचरा असणारी जमीन निवडावी. क्षारयुक्त जमिनीतही हे पीक घेतले जाऊ शकते.
पूर्वमशागत व सेंद्रिय खते
उन्हाळ्यात एक वेळ खोल नांगरणी करून २-३ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या वखरणीपूर्वी हेक्टरी ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.
बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया
भारी जमिनीसाठी बियाण्याचे प्रमाण हे १० किलो प्रति हेक्टरी असावे. मध्यम जमिनीसाठी १२ ते १५ किलो प्रति हेक्टरी व संकरित वाणासाठी ७.५ किलो प्रति हेक्टरी नुसार बियाण्याचे प्रमाण असावे. बीजप्रक्रिया करतांना पेरणीपूर्वी प्रति १० किलो बियाण्यास ॲझोटोबॅक्टर अधिक पी.एस.बी. (प्रत्येकी २०० ग्रॅम) या जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. मर रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे चोळावे. करडईच्या सुधारित व संकरित वाणांमध्ये एकेएस २०७, भीमा, नारी-६, पीकेव्ही पिंक (एकेएस ३११) आणि संकरित नारी-एनएच १ यांचा समावेश आहे.
करडई पेरणीची वेळ व पद्धत
करडईची पेरणी सप्टेंबरच्या चौथ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापर्यंत करावी. त्यामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव टाळता येतो. पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. ओळीतील अंतर ४५ सेंटीमीटर. ठेवावे. आंतरपीक पद्धत: हरभरा + करडई (६:३ किंवा ३:३) किंवा जवस + करडई (६:३) याप्रमाणे आंतरपीक घेता येते.
रासायनिक खत मात्रा व विरळण
कोरडवाहू पिकासाठी पेरणीसोबत ४० किलो नत्र (१९४ किलो अमोनियम सल्फेट किंवा ८७ किलो युरिया) व २५ किलो स्फुरद (१५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्टरी द्यावे. उगवणीनंतर १०-१२ दिवसांनी विरळणी करून दोन रोपांत २० ते ३० सें.मी. अंतर ठेवावे, जेणेकरून हेक्टरी ७५ हजार ते १ लाख झाडे राहतील.
पाणी व तण व्यवस्थापन
तण नियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार १-२ वेळा निंदणी व कोळपणी करावी. मजुरांची कमतरता असल्यास पेरणीपूर्वी फ्ल्युक्लोरेलीन १ किलो (२ लिटर बासालीन) ६००-७०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.एक पाणी उपलब्ध असल्यास: पेरणीनंतर ५० दिवसांनी द्यावे. दोन पाण्यांची सोय असल्यास ३० व्या व ५० व्या दिवशी द्यावे. तीन पाण्यांची सोय असल्यास ३०, ५० आणि ६५ व्या दिवशी पाणी द्यावे.
काढणी, मळणी व उत्पादन
पिकाची पाने व बोंडे पिवळी पडल्यानंतर काढणी करावी. शेतात लहान ढीग करून वाळवल्यानंतर काठीने बडवून किंवा थ्रेशर/कंबाइन हार्वेस्टरच्या साहाय्याने मळणी करावी. मध्यम जमिनीत१० ते १२ क्विंटल/हेक्टरी, तर भारी व ओलिताखालील जमिनीत १४ ते २५ क्विंटल/हेक्टरी उत्पादन मिळते.
शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामात कमी पाण्यात व कमी खर्चात भरघोस उत्पादन घेण्यासाठी करडई पिकाची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Comments
Post a Comment